विना नंबर हायवा वाहनांवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई
११ अवैध हायवा जप्त; ७३,७५० रुपयांचा दंड**
नांदेड (प्रतिनिधी):
नांदेड जिल्ह्यात रेती, मुरुम व मातीची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या अवजड वाहनांविरोधात जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड शहरात अचानक तपासणी करत ११ विना नंबर हायवा वाहने ताब्यात घेतली.
लातूर रोडवरील लक्ष्मी पेट्रोल पंप व विष्णुपुरी परिसरात अवैध वाहतुकीच्या उद्देशाने उभी असलेली ही वाहने आढळून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन, शासनाचा महसूल बुडविणे तसेच अपघातांना आमंत्रण देणाऱ्या अशा वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पकडण्यात आलेली सर्व वाहने पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आली. आरटीओ कार्यालयामार्फत संबंधित वाहनांवर नियमानुसार एकूण ७३ हजार ७५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
जिल्ह्यात यापुढेही विना नंबर, अपूर्ण कागदपत्रे किंवा नियमबाह्य पद्धतीने रेती, मुरुम व मातीची वाहतूक करणाऱ्या हायवा व इतर अवजड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला. वाहन चालक व मालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पकडण्यात आलेल्या हायवा वाहनांचे क्रमांक:
MH 46 BB 9546,
MH 26 CH 2721,
MH 26 CT 7779,
MH 26 CM 7779,
MH 26 CH 4909,
MH 21 BH 0804,
MH 26 CH 7565,
MH 29 BE 4869,
MH 26 CH 2909,
MH 14 LX 4892,
MH 26 CH 2429.
