900 kg of vermilion shell removed from Kasba Ganpati idol | कसबा गणपती मूर्तीवरील 900 किलो शेंदूर कवच काढले: 95 व्या शतकातील मूळ मूर्ती समोर, 31 डिसेंबरपासून दर्शन सुरू – Pune News


पुणे येथील ऐतिहासिक ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातील मूर्तीवरील शेंदूर कवच काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यानंतर १५ व्या शतकातील मूळ मूर्ती समोर आली असून, ३१ डिसेंबरपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

.

मंदिरातील मुख्य दैवत श्री जयति गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेला सोमवार, १५ डिसेंबर रोजी सुरुवात झाली होती. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. मूर्तीवरील शेंदूर कवच गळून पडत असल्याने भविष्यात कोणताही अनपेक्षित प्रसंग उद्भवू नये, यासाठी हे कवच काढणे आवश्यक होते.

देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंदिराच्या उपलब्ध इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार आणि हर्षद ठकार उपस्थित होते.

मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार, समोर आलेल्या मूळ मूर्तीचा कालावधी थेट १५ व्या शतकातला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संबंधित विभागांकडून सविस्तर अहवाल मिळाल्यावर यावर शिक्कामोर्तब होईल.

श्री जयति गजानन यांची मूळ मूर्ती साधारण २ फूट उंच असून चतुर्भुज आहे. तिच्या डाव्या हातांपैकी एक अभय मुद्रेत, तर उजव्या हातांपैकी एक आशीर्वाद मुद्रेत आहे. दुसऱ्या डाव्या हातात मोदक असून त्यावर सोंड ठेवलेली दिसते. उजव्या बाजूला खाली मूषक वाहन आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची असून अर्ध पद्मसनाच्या बैठकीत आहे. लंबकर्ण आणि लंबोदर ही मूर्तीची इतर वैशिष्ट्ये आहेत.

सुमारे ९०० किलो वजनाचा शेंदूर लेप काढल्यावर ही मूळ मूर्ती समोर आली आहे. या प्रक्रियेमुळे मूर्तीचे तत्कालीन कोरीव काम केलेले दगडी सिंहासन आणि प्रेक्षणीय गाभाराही आता भाविकांना पाहता येणार आहे.

शेंदूर कवच काढण्यासाठी पुरातत्व विभाग, विविध मूर्तीतज्ञ आणि धार्मिक क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने तज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली सुमारे दोन आठवड्यांत पार पडली. आता गणेशभक्तांना शिवपूर्वकाळातील या ऐतिहासिक मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *