![]()
गुरुकुंज मोझरी येथील सद्गुरू विहार परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका घरात घरफोडी केली आहे. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेत घरातील कपाटाचे कुलूप तोडून २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुरुदेव नगर येथील सद्गुरू विहार परिसरात नव्यानेच वास्तव्यास आलेले मंगेश महादेव तुमसरे यांच्या घरात ही चोरी झाली. मंगेश तुमसरे हे रात्री खाजगी कंपनीत कामावर गेले होते, तर घरातील इतर सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले होते. नेमक्या याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून आलमारीतील चांदीच्या तोरड्या, बिचवे, हाता-पायातील कडे आणि सोन्याचे मणी असा एकूण २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. घरातील सदस्य घरी परतल्यानंतर त्यांना कपाट तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त दिसले. चोरी झाल्याचे लक्षात येताच मंगेश तुमसरे यांनी तात्काळ तिवसा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तिवसा पोलीस करत आहेत. गुरुकुंज परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गुरुकुंज येथे घरफोडी:सद्गुरू विहार परिसरातील घरातून 21,500 रुपयांचा ऐवज लंपास
