नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपये घेण्याबाबत केलेल्या आरोपावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना सचिव तसेच मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी या दाव्याला ‘वाह्यात’ म्हणत जरांगेंवर टीका केली आहे. तसेच, जरांगेंना उद्या संध्याकाळपर्यंतचे अल्टीमेटम देत १ रुपयाच्या मानहानीच्या खटल्याचा इशारा दिला आहे. ‘मनोज जरांगे हे टेंडर योद्धे आणि भाजपचे टूलकिट’ डॉ. संजय लाखेपाटील यांनी मनोज जरांगे यांचा उल्लेख ‘टेंडर सम्राट’ आणि ‘टेंडर योद्धा’ असा केला आहे. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले आणि ते श्रीकांत शिंदेंमार्फत दिले, असा आरोप तुम्ही करता. मग हे तुम्हाला कोणत्या भाजप नेत्याने सांगितले? का तुम्ही मनानेच ही स्टोरी रचली आहे? हे आरोप करून जरांगेंनी स्वतःच सिद्ध केले आहे की ते भाजपमधील काही अंतर्गत लोकांचे टूलकिट आहेत.” खोटे बोलण्यासाठी जरांगेंना किती कोटींची सुपारी मिळाली आहे, असा थेट सवालही त्यांनी विचारला. ‘नाव सांगा, अन्यथा १ रुपयाचा दावा ठोकेन’ लाखेपाटील यांनी थेट आव्हान देत ते म्हणाले, “जर तुमच्यात थोडेही इमान असेल, जर तुम्ही स्वतःला ९६ कुळी मराठ्याचं रक्त आणि एका बापाचा पोरगा म्हणवत असाल, तर ज्या भाजप नेत्याने तुम्हाला ही बातमी सांगितली त्याचे नाव उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करा. नारायणगडासारख्या पवित्र ठिकाणी सत्यच बोलले पाहिजे.” “तुम्ही नाव उघड केले नाही, तर परवा दिवशी मी तुमच्यावर मानहानीचा खटला दाखल करेन. लोक करोडो रुपयांचे दावे ठोकतात, पण तुमची औकात केवळ एक रुपयाची आहे, त्यामुळे मी एक रुपयाचाच नुकसान भरपाईचा दावा तुमच्यावर ठोकेन,” असा सणसणीत इशारा लाखेपाटील यांनी दिला आहे. या आक्रमक आव्हानामुळे आता मनोज जरांगे पाटील उद्या संध्याकाळपर्यंत कोणत्या भाजप नेत्याचे नाव उघड करतात का? आणि या इशाऱ्याला ते कसे उत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ——————- ही बातमी पण वाचा.. 500 कोटींचा आरोप सिद्ध करा, नाहीतर षड्यंत्र उघडे पाडा: मनोज जरांगेचं उपमुख्यमंत्री शिंदेंना आव्हान; हेक्टरी 1 लाख, संपूर्ण कर्जमुक्ती घेतल्याशिवाय शांत बसणार नाही!
“मराठा समाजाने आता डोळे उघडून स्वतःच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी एकत्र आले पाहिजे. राजकारण्यांचे पक्ष आणि त्यांचे आमदार-खासदार वाढवण्यासाठी स्वतःचा बळी देणे आधी बंद करा. दुष्काळात शेतकरी हतबल झाला आहे, पिके जळून खाक झाली आहेत आणि सरकार अवघे 5,000 रुपये देऊन बळीराजाची क्रूर चेष्टा करत आहे. या 5,000 रुपयांसाठी शेतकऱ्याचे बँकेच्या फेऱ्या मारण्यात आणि प्रवासातच सर्व पैसे खर्च होणार; मग शेतकऱ्याच्या हातात काय उरणार? राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमुक्ती दिलीच पाहिजे. यासाठी सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून मोठा लढा उभारणार,” असा सज्जड इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सविस्तर वाचा
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%