![]()
वैजापूर तालुक्यातील माळीसागज परिसरातील डरे वस्तीवरील तरुण शेतकरी प्रथमेश अशोक डरे यांच्यावर रविवारी (दि.२८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला होता, पण डरे यांनी आपल्या हातातील फावड्याच्या साहाय्याने, त्याचे काका व भाऊ यांच्या मदतीने बिबट्याचा प्रतिकार करत त्याला पळवून लावले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. घटनेचे गांभीर्य पाहून वैजापूर वन विभागाकडून सोमवारी तत्काळ डरे वस्तीजवळील गट नं. ९९ मध्ये पिंजरा लावला आहे. प्रथमेश डरे नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील हरभरा पिकाला पाणी देत होते व त्याच वेळी शेजारील मक्याच्या शेतातून बिबट्याने बाहेर येत प्रथमेशवर हल्ला केला होता. {ए. के. पाटील, वनपाल वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आलेल्या परिसरात कोणीही फिरकू नये. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना मोठ्या आवाजात बोलणे व गाणे चालू ठेवावे. शक्यतो रात्री बाहेर पडू नये. बाहेर पडताना स्वसंरक्षणासाठी हातात टॉर्च व काठी ठेवावी. आपण शेतात असल्यावर टॉर्च चालू ठेऊन, मोबाइलवर मोठा आवाज चालू ठेवावा. त्यामुळे वन्यप्राणी आपल्या जवळ येणार नाही. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना टोळक्याने काम करावे. स्वतःची नेहमी काळजी घ्यावी.
बिबट्यास पकडण्यासाठी माळीसागजमध्ये पिंजरा:शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत कायम
