Kolhapur Parents Murder Over Land Dispute; Son Kills Mother Father Brutally in Hupari | अर्ध्या गुंठ्यासाठी आई-वडिलांची निर्घृण हत्या: डोके दगडाने ठेचले, हाताच्या नसाही कापल्या; माथेफिरू मुलाच्या कृत्याने कोल्हापूर हादरले – Maharashtra News



मालमत्तेच्या वाटणीच्या वादातून झालेल्या वादात एका माथेफिरू तरुणाने आपल्या आई-वडिलांची डोके ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याची भयंकर घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. दीड गुंठ्याचा प्लॉट व त्यातील अर्ध्या गुंठ्याच्या वाटणीसाठी आरोपीने हे टोकाचे पाऊल उचल

.

पोलिसांच्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावात ही घटना घडली आहे. नारायण गणपतराव भोसले (82) व विजयमाला नारायण भोसले (70) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. तर सुनील नारायण भोसले (48) असे आरोपीचे नाव आहे. भोसले यांचा हुपरीत दीड गुंठ्यांचा प्लॉट आहे. त्यातील अर्ध्या गुंठ्याच्या वाटणीसाठी आरोपीने आपल्या आई-वडिलांची हत्या केली.

महिन्याभरापूर्वीही केली होती मारहाण

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण भोसले व त्यांच्या पत्नी विजयमाला हे हुपरीच्या महावीर नगर येथे राहत होते. त्यांना चंद्रकांत, संजय व सुनील ही 3 मुले आहेत. पैकी चंद्रकांत व संजय हे दोघे नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतात. तर सुनील हा घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच राहतो. तो किरकोळ कारणांवरून आपल्या आई-वडिलांना नेहमीच शिवीगाळ करत मारहाण करत होता. महिन्याभरापूर्वीच त्याने त्यांना काठीने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. पण माफी मागितल्यामुळे आई-वडिलांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली नव्हती.

फुटलेल्या काचेने कापल्या हाताच्या नसा

त्यानंतर आज पहाटे त्याने पुन्हा आपल्या आई-वडिलांवर हल्ला चढवत त्यांची निर्घृणपणे हत्या केली. सुनीलने पहाटे 5.45 च्या सुमारास आपल्या आई-वडिलांवर हल्ला चढवला. त्यात त्याने आपल्या वडिलांच्या डोक्यावर लाकडाने प्रहार केला. त्यात घरातील शोकेसची काच फुटली. त्यानंतर त्याच काचेने त्याने आई-वडिलांच्या हातांचा नसा कापल्या. यामुळे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. आईच्या अंथरुणात तिचे तुटलेले मंगळसूत्र व फुटलेल्या बांगड्याचा खच पडला होता. हा आरडाओरडा एकूण त्यांचे शेजारी व चुलत वहिनी राजमाता यांनी झाल्या प्रकाराची माहिती फोनवरून संजय भोसले यांना दिली.

त्यानंतर घरात नेमके काय घडले हे पाहण्यासाठी त्या त्यांच्या घरी गेल्या. तेव्हा आरोपी सुनीलने फरशीचा एक तुकडा त्यांना फेकून मारला. यामुळे त्या पळून गेल्या. त्यानंतर जिवाच्या भीतीने कुणीही भोसले यांच्या घराकडे गेले नाही.

पुरावे नष्ट करण्याचाही केला प्रयत्न

आई-वडिलांना ठार मारल्यानंतर सुनीलने खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी बांबूचे दांडके, विळ्याचे पाते बाथरूममध्ये नेऊन धुतले. त्यानंतर आपल्या शेडजवळील दरवाजाच्या भिंतीजवळ नेऊन ठेवले. तद्नंतर तो घराचे गेट बंद करून आपल्या घराबाहेर निर्विकारपणे बसला होता. कुणी घराजवळ आल्यास त्यांच्यावर हल्ला करण्याचीही धमकी देत होता. त्यामुळे कुणीही तिकडे जाण्यास धजावत नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *