MNS Leader Harish Heda Accident Death Karanja Washim Bypass Tragedy | ‘विझलो जरी मी, हा माझा अंत नाही…’: अशी पोस्ट लिहिणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यावर काळाचा घाला; कारंजात हरिश हेडांचा अपघाती मृत्यू – Amravati News



नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ‘विझलो जरी मी, हा माझा अंत नाही…’ अशी पोस्ट लिहिणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा दुसऱ्याच दिवशी अपघाती मृत्यू झाला. कारंजा-वाशिम बायपासवर बुधवारी रात्री झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिश हेडा हे बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने काही कामानिमित्त वाशिम बायपासवरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरातून जात होते. यावेळी एका भरधाव पिक-अप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, हरिश यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातापूर्वी त्यांनी आपल्या मुलीला शिकवणी वर्गातून घरी सोडले होते आणि मित्रांची भेटही घेतली होती, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.

ती फेसबुक पोस्ट ठरली शेवटची!

कारंजा नगरपालिका निवडणुकीत हरिश हेडा यांच्या पत्नी अलका हेडा यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती. दोन दिवसांपूर्वीच लागलेल्या निकालात त्यांचा पराभव झाला. राजकीय जीवनातील या मोठ्या धक्क्याने खचून न जाता, हरिश यांनी मंगळवारी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी सुरेश भटांच्या “विझलो जरी मी…” या ओळींमधून पुन्हा नव्या दमाने राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले होते. तसेच मतदारांचे आभारही मानले होते. मात्र, नव्या जिद्दीने पेटून उठण्यापूर्वीच त्यांच्या आयुष्याचा दिवा मालवला गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

2008 पासून राज ठाकरेंचे एकनिष्ठ कार्यकर्ता

हरिश हेडा हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचारसरणीने भारावलेले कार्यकर्ते होते. 2008 मध्ये मनसेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी पक्षकार्यात स्वतःला झोकून दिले होते. एक कट्टर कार्यकर्ता, उत्कृष्ट संघटक आणि राज ठाकरेंच्या भाषण शैलीचे चाहते म्हणून त्यांची ओळख होती. कारंजा शहरात मनसेची पाळेमुळे घट्ट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

हरिश हेडा यांच्या निधनाचे वृत्त समजताच कारंजा शहरात सन्नाटा पसरला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. एका संवेदनशील आणि लढाऊ कार्यकर्त्याच्या अशा अचानक जाण्याने राजकीय क्षेत्रासह सर्वच स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *