![]()
“येत्या 29 ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी राहायचे नाही. मराठे मोठ्या संख्येने मुंबईला येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईला जाऊन मला बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत… शेअर मार्केटचा बैल पाहायचा आहे, विमान कसं उडतं ते पाहायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांचं ‘वर्षा’ निवासस्थान कसं आहे, तेही बघायचं आहे. मला तर वाटतंय की आता ‘वर्षा’वरच उपोषणाला बसलेलं बरं राहील. तिथे फडणवीसांनी जी पाण्याची टाकी ठेवली आहे, त्याच पाण्याच्या टाकीवर मी उपोषणाला बसणार आहे,” असा थेट आणि आक्रमक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बावनकुळे आणि फडणवीसांवर ‘जातीयवादाचा’ आरोप “मराठ्यांचे अनेक आमदार आणि मंत्री झाले, पण कुणीही कधी मराठ्यांना पत्र दिले नाही किंवा आमच्या अन्नात माती कालवली नाही. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या तोंडातला घास हिसकावण्याचे काम केले आहे. आम्ही त्यांना चूक सुधारायला सांगितली होती. आम्हाला वाटले होते की फडणवीस त्यांची चूक मान्य करतील, पण ते उलट पाठराखण करत आहेत. हे दोघेही मराठ्यांसोबत जातीयवाद करत आहेत,” असा गंभीर आरोप जरांगेंनी केला. मराठे खावळून उठलेत, आता उठाव करावाच लागेल “गोरगरीब मराठ्यांवर खूप अन्याय झाला आहे. ज्या मराठ्यांनी यांना सत्तेत बसवले, त्यांनाच हे विसरले आहेत. केवळ मराठाच नव्हे तर यांनी धनगर समाजाचे वाटोळे केले, शेतकऱ्यांची फजिती केली आणि बंजारा, आदिवासी समाजाच्या योजना खाऊन घेतल्या. आपण किती दिवस आंधळे होऊन हे सगळं बघणार आहोत? आता कष्ट करण्याची वेळ आली आहे, मराठ्यांना त्रास देणाऱ्यांची मजा उतरवण्यासाठी उठाव करावाच लागेल,” असे आवाहन जरांगे यांनी समाजाला केले. 29 ऑगस्टला मुंबईत धडक! 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाने मुंबईकडे कूच करण्याचे संकेत जरांगे यांनी दिले आहेत. त्यांनी सांगितले की, “मराठे मुंबईला धडकतील आणि पुढचे उपोषण हे थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावरील पाण्याच्या टाकीवरच होईल.” जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची सरकारची तयारी मनोज जरांगे यांच्या ‘वर्षा’वरील आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तातडीने प्रतिक्रिया देत सरकारची बाजू मांडली. दरेकर म्हणाले, “मनोज जरांगे रोज नवीन इशारे देत असतात. लोकशाहीत त्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सुरुवातीला त्यांना कुणबी प्रमाणपत्र हे केवळ शिक्षण आणि नोकरीसाठी हवे होते, त्यांनी कधीही राजकारणासाठी आरक्षणाची मागणी केली नव्हती.” “वस्तुस्थिती अशी आहे की, देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजासाठी सर्वाधिक योजना आणि सोयी-सुविधा आणल्या आहेत. जरांगे यांनी सरकारशी समन्वय साधला तर त्यांचा प्रश्न नक्की मार्गी लागेल. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे,” असे दरेकर यांनी स्पष्ट केले. येत्या २९ ऑगस्टला मनोज जरांगे खरंच मुंबईत धडकून ‘वर्षा’ बंगल्यावर आंदोलन करणार का? आणि सरकार हा वाढता रोष कसा शांत करणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. हेही वाचा… कुंभमेळ्यातील 591 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डरचे प्रकरण : काँग्रेसचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल; वडेट्टीवारांसह वर्षा गायकवाड यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांकडून 3 कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक (पुतण्या) तनय महाजन याला जामनेर येथून अटक करण्यात आली आहे. ‘दै. दिव्य मराठी’ने प्रकाशात आणलेल्या या खळबळजनक घोटाळ्यावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
पुढचं आंदोलन थेट वर्षावर, पाण्याच्या टाकीवरच बसणार:मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा; म्हणाले- बावनकुळे वाटोळं करायला बसलेत
