![]()
पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकासासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरित महाराष्ट्र अंतर्गत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट, अक्षय ऊर्जेसाठी मोठी गुंतवणूक आणि प्रदूषण कमी करण्यासाठी जुन्या वाहनांवर वाढीव कर अशा विविध उपाययोजनांचा समावेश आहे. राज्याने 2029 पर्यंत 50 टक्के आणि 2035 पर्यंत 65 टक्के हरित ऊर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी सुमारे 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. ऊर्जा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 55 उदंचन प्रकल्पांसाठी करार करण्यात आले असून, त्यातून 78,215 मे.वॅ. वीजनिर्मिती अपेक्षित आहे. सध्या 6 प्रकल्पांचे काम सुरू झाले असून, त्यातून 10,300 मे.वॅ. वीजनिर्मिती होणार आहे. सौर ऊर्जेत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. राज्यातील 4.57 लाख ग्राहकांनी 1735 मे.वॅ. क्षमतेचे रुफटॉप सोलार बसवले असून, त्यासाठी 3200 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. आता शून्य ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासिय रुफटॉप सोलार योजना’ मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचा 5 लाख लाभार्थ्यांना फायदा होणार असून, सरकार 635 कोटींचे अनुदान देणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने जुन्या वाहनांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुने वाहन मोडीत काढून नवीन वाहन खरेदी केल्यास मोटर वाहन करात 15 टक्के सूट मिळेल. तसेच नवीन वाहन खरेदी करताना बीएस-4 व त्यावरील वाहनांना 16 टक्के, तर बीएस-3 व त्याखालील मानके असलेल्या वाहनांना 30 टक्के कर सवलत दिली जाणार आहे. तसेच जुन्या खासगी वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ‘पर्यावरण कर’ दुप्पट करण्यात आला आहे. दुचाकींसाठी हा कर 2000 रुपयांवरून 4000 रुपये, हलकी मोटर वाहने 3000 वरून 6000 रुपये आणि डिझेल हलकी वाहनांसाठी 3500 वरून 7000 रुपये इतका वाढवण्यात आला आहे. वृक्ष लागवड आणि वारसा जतन पर्यावरण संतुलनासाठी राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली जाणार आहे. याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील ऐतिहासिक सागवान वारशाचे जतन आणि संशोधनासाठी ‘टिंबर म्युझियम व झायलॅरियम’ उभारले जाणार आहे, ज्यामुळे वनसंपत्तीबाबत जनजागृती होण्यास मदत होईल.
'हरित महाराष्ट्र'साठी मुख्यमंत्र्यांची महत्त्वाच्या घोषणा:300 कोटी वृक्ष लागवड आणि अक्षय ऊर्जेवर भर, जुन्या वाहनांवर 'पर्यावरण कर' वाढला
