![]()
काँग्रेसने चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड मुसंडी मारल्यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार प्रचंड आक्रमक झालेत. त्यांनी या प्रकरणी ‘मुख्यमंत्रीपद असो वा मंत्रिपद काहीही शाश्वत नसते’ असे तिखट मत व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रशेखर बा
.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला दैदिप्यमान यश मिळाले. पण चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाचा दारुण पराभव झाला. येथे काँग्रेसचे 11 पैकी 8 जागांवर नगराध्यक्ष निवडून आले. यामुळे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मुनगंटीवार यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, मी कधीच नाराज असत नाही. माझ्या आयुष्यात महादेवाने मला नाराज न होण्याची शक्ती दिली आहे.
पण भाजपचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून योग्य वेळी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी माझी आहे. कार्यकर्ते जे भूमिका माझ्यापर्यंत पोहोचवतात ते सांगण्याची जबाबदारी माझी आहे. ती जबाबदारी व्यवस्थितपणे मी पार पाडतो. मला मंत्रिपद नाकारण्यात आले. त्याची नाराजी माझ्यात नव्हे तर येथील जनतेत आहे. मंत्रिपद येते आणि जाते. मुख्यमंत्रीपदही ज्यांचे आहे त्यांचे येणार आहे जाणारही आहे. पर्मनन्ट कुणीही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत कुणीही मंत्री, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री नाही.
बावनकुळेंना करून दिली पडत्या काळाची आठवण
सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रिपद नसण्याचा व पराभवाचा थेट संबंध नसतो या विधानाचाही समाचार घेतला. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना आता असे वाटणे साहजिक आहे. पण मध्यंतरी जेव्हा त्यांची शक्ती करण्यात आली होती, तेव्हा त्यांनाही असेच वाटत होते, असे ते बावनकुळेंना त्यांच्या पडत्या काळाची आठवण करून देताना म्हणाले.
आत्ता पाहू पराभवानंतर काय म्हणाले होते मुनगंटीवार?
उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपने विदर्भातील 100 पैकी 55 जागा जिंकल्या. पण चंद्रपूरमध्ये अगदी उलट झाले. जिल्ह्यातील 11 पैकी तब्बल 8 जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला. येथे भाजपला अवघ्या 2 नगराध्यक्षांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सुधीर मुनगंटीवर यांनी या पराभवाचे खापर पक्षाच्या धोरणांवर फोडले होते. पक्षाने माझी शक्ती कमी केली. मी हा पराजय नम्रपणे स्वीकारतो. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली. पण माझ्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. या जिल्ह्यात गटबाजीला पोषक वातावरण तयार होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसले, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका
सुधीर मुनगंटीवारांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले, पक्षाला दारच असू नये. पक्षाची दारे कोणत्याही समाजासाठी, कोणत्याही व्यक्तीसाठी बंद असू नये. पक्ष हा बिनदाराचाच असला पाहिजे. फक्त प्रवेश देताना व्यक्ती योग्य आहे की अयोग्य, पक्षाला त्याचा काही फायदा होईल की नाही हे आपण पाहिले पाहिजे. पक्षाने काही लोकांना प्रवेश दिला असेल तर त्याचा फायदाच झाला आहे. समजा सुधीरभाऊना काही ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई आम्ही महापालिका निवडणुकीत करू. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महापालिका निवडून आणू, असे ते म्हणाले.
