पोलीस निरीक्षक अतुल भोसले साहेब डीआयजी पथकाचा काही बंदोबस्त करा 

0
ChatGPT-Image-Apr-29-2026-11_54_37-AM.jpg


नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात काय चाललंय, हा प्रश्न आता सामान्य नागरिकांपेक्षा पोलीस खात्यालाच जास्त पडलेला दिसतो. कारण स्थानिक गुन्हा  शाखेत नुकतेच रुजू झालेले नूतन पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पदभार स्वीकारताच शहरातील गुन्हेगारीने जणू स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजीच केली. अवघ्या ४८ तासांत दोन खून! म्हणजे नवीन साहेबांच्या स्वागतासाठी गुन्हेगारांनी रेड कार्पेटच अंथरल्याचा संशय नागरिकांना येऊ लागला आहे.

खरे तर कोणताही नवीन प्रभारी अधिकारी भागाचा अभ्यास करतो, नकाशे पाहतो, माहिती गोळा करतो आणि मग रणनीती आखतो. पण नांदेडमध्ये रणनीती आखण्याआधीच गुन्हेगारांनी आम्ही आधीच तयार आहोत असा संदेश दिल्याचे चित्र आहे. जुन्या वैरातून झालेले खून असतात, हे सर्वांनाच ठाऊक; मात्र तीन पत्त्यांचे जुगार, मटका, अवैध वाळू आणि गुटखा व्यवसाय हे मात्र कुणाच्या तरी आशीर्वादाशिवाय चालत नाहीत, ही जनतेची निरागस समजूत अजूनही कायम आहे.

दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने काल काही जुगार अड्ड्यांवर धाडी टाकल्याने शाखेचे नाव खराब होत असल्याची चर्चा रंगली आहे. जुगार बंद करण्यापेक्षा धाड टाकणाऱ्यांचाच बंदोबस्त करायची वेळ आली का, असा उपरोधिक सवाल नागरिक विचारू लागले आहेत. अवैध धंदे जिल्ह्यात शिरणार नाहीत अशी जबाबदारी साहेबांवर आहे, पण धंदे मात्र आधीच जिल्हाभर पर्यटनाला निघाल्यासारखे फिरताना दिसत आहेत.

नांदेड परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांत विशेष पथके कार्यरत असल्याचे सांगितले जाते. काही काळ फटाके वाजले, कारवाया झाल्या आणि नंतर शांतता… म्हणजे गुन्हेगारीवर नव्हे तर कारवाईवरच ब्रेक लागल्याचा अनुभव लोकांना आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेली खबर हेल्पलाइन ही जनतेसाठी आशेची किरण मानली जात असली, तरी माहिती देणाऱ्यांपेक्षा माहिती लपवणाऱ्यांचीच धावपळ अधिक असल्याचे चित्र आहे.

काल दिनांक २८ एप्रिल २०२६ वजीराबाद परिसरातील दोन मटका दुकानांवर कारवाई करून १३ जणांवर गुन्हे दाखल झाले, ही बातमी जाहीर झाली आणि शहराने सुटकेचा नि:श्वास टाकला. कारण उरलेले अड्डे अजूनही कायदेशीर शांततेत सुरू असल्याची नागरिकांची समजूत आहे.आता खरी जबाबदारी साने गुरुजी शाखेची आणि नूतन निरीक्षकांची आहे. नांदेडमध्ये गुन्हेगारीवर बंदोबस्त होणार की बंदोबस्ताच्या नावाखाली फक्त बैठका आणि बातम्या सुरू राहणार याची उत्सुकता मात्र जनतेला लागून राहिली आहे. नागरिकांचे म्हणणे एकच… साहेब, धाडी कमी आणि धंदे बंद जास्त झाले तरच खरी कारवाई म्हणायची! म्हणजे डीआयजी पथकाचा बंदोबस्त होईल.

संबंधित बातमी …. 

पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवून पोलीस निरिक्षक भोसले यांना देण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा 


Post Views: 333






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed