पार्थ पवारांच्या खासगी दौऱ्यात सरकारी अधिकारी कसे?:VSR विमान प्रवासावर RTI कार्यकर्त्याचा सवाल; जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-29t13_1777449996.png




माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्या व्हीएसआर कंपनीच्या विमान प्रवासावर जोरदार टीका केली आहे. 1800 कोटींची जमीन मोफत स्वतःच्या कंपनीच्या नावावर करून घेताना पार्थ पवारांना काहीही माहिती नसते. आणि त्यांच्या म्हणण्यावर सरकार व यंत्रणा विश्वास ठेवते. जनतेला मूर्थ समजणे बंद करा. तुमच्या खासगी दौऱ्यात सरकारी अधिकारी कसे? याचे उत्तर द्या, असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या कुटुंबीयांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या भोजनासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार व जय पवार यांना निमंत्रण दिले होते. पार्थ पवार या कौटुंबिक भेटीसाठी मुंबईतून व्हीएसआर कंपनीच्या विमानाने पुण्याला पोहोचले. व्हीएसआर कंपनीच्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी या कंपनीवर टीकेची झोड उठत असताना पार्थ यांनी प्रवासासाठी याच कंपनीच्या विमानाचा वापर केल्याने त्यांच्यावरही टीका झाली. अखेर पार्थ पवारांनी सदर विमान व्हीएसआर कंपनीचे असल्याचे आपल्याला माहिती नसल्याचे स्पष्ट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. म्हणे मला आणि ऑफिसला माहितीच नव्हतं? पण आज सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुन्हा या मुद्यावरून त्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, आपल्या देशातले राजकारणी जनतेची दिशाभूल करण्यासाठी सोयीस्कररित्या “निरागस” होत असतात. वडिलांचा मृत्यू ज्या कंपनीच्या विमान अपघातात झाला, ज्यांच्याविरूद्ध आरोपांची राळ उठवली गेलीय, जी अजित दादांच्या मृत्यू संदर्भात संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्याच कंपनीचे विमान पुन्हा पार्थ पवारांनी बुक केले, प्रवास केला. … आणि म्हणे मला आणि ऑफिसला माहितीच नव्हतं.? चार्टर विमान बुक करताना कंपनीचे नाव, कागदपत्रे, परवानग्या, बिलिंग, सुरक्षा तपशील – काहीच कळत नाही का? “नकळतपणे” हा शब्द वापरला म्हणून सत्य बदलत नाही. कुटुंबात एकमेकांना इशारे देताना जनतेची दिशाभूल होतेय हेही लक्षात असू द्या. 1800 कोटी रूपयांची सरकारी जमीन मोफत स्वतःच्या कंपनीच्या नावावर करून घेतानाही त्यांना काहीही माहित नसतं. आणि त्यांच्या म्हणण्यावर सरकार आणि यंत्रणा विश्वास ठेवतात. जनतेला मूर्ख समजणे बंद करा. उत्तर द्या – जबाबदार कोण? सरकारी अधिकारी तुमच्या खाजगी दौऱ्यात कसे आणि कोणत्या अधिकारात, असे ते म्हणालेत.
चार्टर फ्लाइटचे पैसे कुणाच्या खिशातून? – दमानिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, ज्या VSR कंपनीच्या विमान अपघातात तीन महिन्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला, त्याच विमानात मुलगा जातो? त्या VSR कंपनी च्या चौकशीची मागणी करायचे सोडून, त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातो? सुनेत्रा पवारांचे OSD, राम चौबे आणि विकास पाटील, जे सरकारी अधिकारी आहेत आणि सरकारी पगार घेतात, ते पुन्हा एकदा पवारांच्या घरासाठी काम करत आहेत? मी पुन्हा एवढ्यासाठी म्हणत आहे कारण, हेच ते दोघे जे पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थच्या बाजूने उभे होते. तेव्हा अजित पवारांचे PA, आता सुनेत्रा पवारांचे प्रश्न साधे आहेत. सरकारी अधिकारी खाजगी कामासाठी कसे जाऊ शकतात? चार्टर फ्लाइटचे पैसे कुणाच्या खिशातून? आणि VSR च्या त्याच विमानात पार्थ पवार बसले तरी कसे? उत्तरं जनतेला हवीत, असे त्या म्हणाल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *