बच्चू कडूंनी 'प्रहार'च्या विलिनीकरणाची चर्चा फेटाळली:म्हणाले – निव्वळ आमदारकीसाठी शिवसेनेसोबत जावे एवढा मी नालायक नाही
![]()
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आपल्या संघटनेची शिवसेनेसोबत होणाऱ्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा फेटाळली आहे. आम्ही खूप संघर्षातून संघटना उभी केली आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या बातम्या पाहून दुःख वाटले. मी जुना शिवसैनिकच आहे. शिवसेनेशी बंडखोरी करून आम्ही प्रहार संघटना उभी केली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षात न जाता स्वतःच्या जिवावर संघर्ष करणारा मी राज्यातील एकमेव कार्यकर्ता आहे. आम्हाला कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नाही. पाठिंबा देतो म्हटले तरी आम्ही घेत नाही. एवढे आम्ही तटस्थ आहोत, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत, असे सांगत विधान परिषदेवर जाण्याची आपली तयारी असल्याचेही स्पष्ट केले. माजी मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेषतः शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याचाही दावा केला जात आहे. बच्चू कडू यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी विस्तृत भाष्य केले. ते म्हणाले, माध्यमांनी सूत्रांचा दाखला देत मी शिवसेनेच्या मदतीने विधानपरिषदेवर जाणार असल्याची बातमी दिली. उद्या विधानपरिषद भेटली, तर ती मीडियाची कृपा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. दुसरे आभार मानतो मी एकनाथ शिंदेंचे. एकनाथ शिंदे यांनी सत्तांतर केले तेव्हा मी एक राजकीय भूमिका घेतली होती. त्यामुळे माझी बदनामीही खूप झाली होती. त्या राजकीय भूमिकेमुळे मला दिव्यांग मंत्रालय मला भेटले. कदाचित मला मंत्रिपद भेटले असते. पण मी ते टाळले. मी पुन्हा कामाला लागलो. नंतर शेतकरी कर्जमाफीचे आंदोलन झाले. आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यात एकनाथ शिंदेंची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. त्यांच्या भूमिकेमुळेच आज कर्जमाफीची घोषणा झाली. या घोषणेमुळेच आमच्या आंदोलनाला यश मिळाले. शब्दाचा पक्का म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, असे कडू यावेळी शिंदेंचे कौतुक करताना म्हणाले. भाजपसोबत गेल्यामुळे फटका बसला बच्चू कडू म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या काळात मी मंत्री होतो, पण एकनाथ शिंदेंच्या काळात आमदार राहिलो. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत माझा पराभवही झाला. कारण, माझा मतदार हा मुस्लिम, बौद्ध व दलित बांधव होते. मी भाजपसोबत गेल्यामुळे त्याचा फटका बसला. मध्यंतरी मनोज जरांगे साहेबांचाही मुद्दा होता. या सगळ्या गोतावळ्यात मी सुद्धा 30-40 जागा लढल्या. त्यात आमचा पराभव झाला. पण आमचा थकलो नाही. वर्षभरात मी दोनवेळा उपोषण केले. 500 किलोमीटर पायी चाललो. 350 सभा महाराष्ट्रभर घेतल्या. या सर्वानंतर कर्जमाफीचा धागा गवसला. सध्या जातीधर्माच्या नावाने लोकं मेंढरासारखे जातात बच्चू कडू म्हणाले, आम्ही दिव्यांगांचे 2500 रुपये वाढवले. 600 रुपयांच्या महिन्याची लढाई मी दिव्यांगांच्या ताकदीने लढून 2500 वर नेली. आ्ही 185 शासन निर्णय काढले. याद्वारे चळवळ काय असते हे आम्ही महाराष्ट्राला दाखवून दिले. ही आमची आमदार नसतानाची कामगिरी आहे. आम्ही भूमिहीन नागरिकांना अपघात विमा लागू करण्याची मागणी केली होती. त्याचाही शासन निर्णय निघाला. सध्या बिगरजातीचे लोक कुणी घेत नाही. कारण, आजचे राजकारण विकासापेक्षा जाती-धर्मावर अवलंबून आहे. जातीधर्माच्या नावाने लोकं मेंढरासारखे जातात. पण आम्ही मुद्द्यांची लढणारी लढाई लढणारे आहोत. कदाचित आमचा विचार झाला, तर आमचे काही मुद्दे आहेत. आम्ही आमदारकीसाठी जाणार का? तर बिल्कुल नाही. दिव्यांगाचे उर्वरित मुद्यांची पूर्तता झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यांची कर्जमाफी, पगार वाढ, घरकुल आदी मुद्दे आहेत. दुसरा मुद्दा असा की, पेरणी ते कापणीची सर्व कामे एमआरजीएसमधून झाली पाहिजे. हमीभावाचाही आमचा मुद्दा आहे. एकनाथ शिदेंचेचाच नाही, तर आमचाही त्यांना प्रस्ताव बच्चू कडू म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी उद्या आमचा विचार केला, तर आमचाही प्रस्ताव आहे. त्यांचाच थोडा प्रस्ताव आहे. आम्ही पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारे नाही. ते इतर पक्ष करतात. बच्चू कडूची युती ही मुद्द्यांसोबत असेल. मुद्दा असेल तरच आम्ही पुढे पाऊल टाकू. हमीभावाची लढाई आहे, मेळघाटातील काही प्रश्न आहेत. स्कायवॉक आहे. शकुंतला एक्सप्रेसचा मुद्दा आहे. संत्रा, द्राक्ष, कांदा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. या महत्त्वाच्या मुद्यांवर भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. त्यावर भूमिका मांडली पाहिजे. विधवा भगिणी आहेत. लाडक्या बहिणींना तुम्ही दरमहा 1500 रुपये देता, पण विधवा व परितक्त्या महिलांना तुम्ही तेवढेच देता. म्हणजे पती असलेल्या व नसलेल्यांनाही सारखीच मदत करता. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते आम्ही एकनाथ शिंदे यांना देऊ. निव्वळ आमदारकीसाठी शिवसेनेसोबत जावे एवढा काही नालायक बच्चू कडू नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होईल. प्रहार किमान 1 लाख सभासद असणारी संघटना आहे. 5-10 लाख दिव्यांग बांधव आमच्यासोबत आहेत. त्यामुळे बच्चू कडू केवळ विदर्भ व अमरावतीपुरता मर्यादित आहे असे नाही. आम्ही मुंबईत असतो तर वेगळा विषय राहिला असता. कारण, इथे किरकोळ गोष्ट उचलली तर बातमी होते आणि तिकडे आम्ही मेलो तरी बातमी होत नाही. कारण, इथे मीडिया आहे. संघर्षातून संघटना उभी केली आम्ही खूप संघर्षातून संघटना उभी केली आहे. त्यामुळे विलिनिकरणाच्या बातम्या वाचून दुःख वाटत होते. मी जुना शिवसैनिकच आहे. शिवसेनेशी बंडखोरी करून आम्ही प्रहार संघटना उभी केली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षात न जाता स्वतःच्या जिवावर संघर्ष करणारा बच्चू कडू राज्यातील एकमेव कार्यकर्ता आहे. आम्हाला कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नाही. पाठिंबा देतो म्हटले तरी आम्ही घेत नाही. एवढे आम्ही तटस्थ आहोत, असेही बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले.
