विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट?:99 टक्के उद्धव ठाकरेच उमेदवार; मविआमध्ये ठाकरेंच्या उमेदवारीवर संभ्रम; शेवटच्या क्षणी मोठा निर्णय?
![]()
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी मात्र 99 टक्के उमेदवार उद्धव ठाकरेच असतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. तरीही त्यांनी 1 टक्का सांगता येत नाही, पण बॉस इज ऑल्वेज राईट, असे म्हणत अंतिम निर्णय नेतृत्वावरच अवलंबून असल्याचे सूचित केले. त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवारीबाबत चर्चा अधिकच रंगल्या आहेत. या संदर्भात खासदार संजय राऊत यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आमचा एकच उमेदवार आहे, सगळ्यांचा मिळून, असे सांगत त्यांनी इतर पक्षांनी आपापल्या याद्या जाहीर केल्याचे नमूद केले. उद्या अर्ज भरण्याचा दिवस आहे. सकाळी 11 वाजता नेमकं कोण अर्ज दाखल करणार ते स्पष्ट होईल, असे राऊत म्हणाले. तसेच विधान भवनाच्या पायऱ्यांवर गेल्यावरच उमेदवाराचं नाव कळेल, असे म्हणत त्यांनी अधिकृत घोषणा टाळली. त्यामुळे उद्या अर्ज कोण भरणार, उद्धव ठाकरे की दुसरा उमेदवार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला असलेल्या एकमेव जागेसाठी उमेदवार कोण असणार, यावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्याकडून सातत्याने धरला जात आहे. मात्र अर्ज भरण्याची मुदत जवळ आली असतानाही ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनाच उमेदवारी द्यावी, यावर ठाम असल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह ठाकरे गटातील वरिष्ठ नेतेही त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही ठाकरे यांनी अद्याप अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे जर त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला, तर पर्यायी उमेदवार कोण असेल, याबाबतही स्पष्टता नाही. अंबादास दानवे, सुषमा अंधारे किंवा विनायक राऊत यांची नावे चर्चेत असली, तरी अधिकृत निर्णय अजूनही प्रलंबित आहे. उद्धव ठाकरे यांनी 2020 साली विधान परिषदेवर प्रवेश केला होता आणि त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा सभागृहात येणार का, हा प्रश्न सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. पक्षांतर्गत त्यांना पुन्हा आमदारकी घ्यावी, असा जोरदार आग्रह असल्याचेही सांगितले जाते. शेवटच्या क्षणी निर्णय घेऊन अर्ज दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, जर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडूनही अशा परिस्थितीत बिनविरोध निवडणुकीकडे कल राहू शकतो, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या निर्णयावर निवडणुकीचे चित्र पूर्णपणे अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. महायुतीचे किमान 8 उमेदवार निवडून येण्याची शक्यता विधान परिषद निवडणुकीच्या गणिताकडे पाहिले, तर एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे पारडे जड दिसत आहे. भाजपकडे 131 आमदार, शिवसेना शिंदे गटाकडे 57, तर अजित पवार गटाकडे 40 आमदार आहेत. या बळावर महायुतीचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 असल्याने त्यांचा फक्त एकच उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ शकतो.
