जवळा देशमुख येथे बालविवाह विरोधी पथनाट्यातून जनजागृती
नांदेड – महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापासून नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी होऊ घातलेले तब्बल ११ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. परंतु बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करणाऱ्या चाईल्ड लाईन १०९८ ही राष्ट्रीय आपत्कालीन सेवा २४ तास कार्यरत असतांनाही १९ एप्रिलपासून अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. या पार्श्वभूमीवर लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुलामुलींनी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली
बालविवाह विरोधी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ नुसार विवाहासाठी मुलाचे किमान वय २१ वर्षे व मुलीचे १८ वर्षे असणे आवश्यक आहे. या संदर्भात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी व अंगणवाडी सेविका यांची भूमिका बालविवाह प्रतिबंधासाठी महत्त्वाची ठरत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थीही जनजागृतीसाठी सरसावले आहेत. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यात तेजल शिखरे, सोनल गोडबोले, नागेश मठपती, अनन्या टिमके, मयुरी गोडबोले, शाहेद शेख, विद्या गोडबोले, विश्वदीप झिंझाडे, प्रेम गोडबोले, सिद्धांत गोडबोले, पीरखाँ पठाण, अजिंक्य गोडबोले, सपना हाटकर, वीर गोडबोले, सतीश साबणे, स्वराज शिखरे, सुप्रिया गच्चे, दीपक शिखरे, नामदेव पांचाळ, अपेक्षा गोडबोले, प्रणिता गोडबोले या विद्यार्थी विद्यार्थींनींनी सहभाग घेतला. यावेळी गावकऱ्यांची उपस्थिती होती.
Post Views: 58
