Bacchu Kadu | एकनाथ शिंदेंसोबत विलीनीकरणाची चर्चा; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘विधानपरिषदेसाठी…’
Bacchu Kadu | विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) एकनाथ शिंदेंसोबत विलीनीकरण करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. मात्र आज अखेर बच्चू कढू यांनी या सर्वा चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.
केवळ पद मिळवण्यासाठी किंवा आमदारकीसाठी आपण लाचार नाही, असे ठाम बच्चू कडू यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेनेसोबत युती किंवा विलीनीकरणाच्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी स्वाभिमानाला प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत.
विलीनीकरणाची अट आणि स्वाभिमानाची लढाई
गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, शिवसेनेकडून (Shiv Sena) विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे; मात्र त्यासाठी त्यांनी आपला ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ शिवसेनेत विलीन करावा, अशी अट घालण्यात आली. यावर कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, विलीनीकरणाच्या वृत्ताने आपल्याला वाईट वाटल्याचे त्यांनी सांगितले. १ लाखांहून अधिक सदस्य असलेल्या आपल्या संघटनेचे अस्तित्व संपवून आपण पदाच्या मागे धावणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बच्चू कडू पुढे म्हणाले की, आपण मुद्द्यांसाठी युती करणारे आहोत, केवळ सत्तेसाठी नाही. “आमदारकी मिळवण्यासाठी मी एवढा नालायक नाही की स्वतःचा पक्ष विकून टाकेन” विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही आपली ताकद कमी झालेली नाही आणि दिव्यांग बांधव, शेतकरी व कष्टकरी हेच आपल्यासाठी सर्वोच्च असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे लक्ष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आपली चर्चा झाली असली तरी विलीनीकरणावर कोणताही अधिकृत संवाद झालेला नाही, असे कडू यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आपल्या बॅगेत तयार आहेत, पण सन्मानजनक तोडगा आणि मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. जर एकनाथ शिंदे यांना शेतकरी आणि दिव्यांगांना न्याय द्यायचा असेल, तर त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
२०२४ च्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचा निर्णय मतदारांना रुचला नसल्याने पराभवाचा सामना करावा लागला, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी यावेळी दिली. प्रहार संघटनेने नेहमीच बंडखोरी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असून, कोणाचीही या संघटनेवर अन्याय करण्याची हिंमत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता ३० एप्रिलच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी मुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
News Title: Bacchu Kadu on Shiv Sena Merger Condition Vidhan Parishad Election 2026
