लोहगावमध्ये भाड्याच्या बंगल्यात गांजाची लागवड:परप्रांतीय तरुणाला अटक, 41 झाडे लावल्याचे उघडकीस; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
![]()
पुणे पोलिसांनी लोहगाव येथील एका बंगल्यात गांजाची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ४१ गांजाची झाडे लावल्याचे उघडकीस आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हर्ष भरतकुमार पांचाल (वय ३०, रा. नमो पॅरेडाईज, पठारे वस्ती, लोहगाव) आहे. पांचाल मूळचा गुजरातमधील अहमदाबादचा रहिवासी असून, त्याने लोहगावमध्ये एक बंगला भाड्याने घेतला होता. गस्त घालणारे पोलिस शिपाई आकाश मोरे आणि अमोल आदलिंग यांना पांचाल गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकला. बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत गांजाची ४१ झाडे लावलेली आढळली. पोलिसांनी पांचालच्या मोटारीतूनही गांजा जप्त केला. अमली पदार्थ कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये गांजाची झाडे, मोटारीतील गांजा आणि मोटार यांचा समावेश असून, त्याची एकूण किंमत सहा लाख रुपये आहे. पांचाल हा कधीपासून सदर सदनिकेत भाड्याने राहत होता तसेच त्यांनी गांजाची विक्री आतापर्यंत कुठे कुठे केली आहे त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत याबाबत अधिक तपास लोहगाव पोलिसांनी सुरू केला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोहगाव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील, सहायक निरीक्षक शुभांगी मगदूम, उपनिरीक्षक मनोज बरूरे, गणेश इथापे, अमोल आदलिंग, गणेश सातपुते, बाळासाहेब शिरसाठ, जोतीराम देवकाते, दादासाहेब बर्डे, अश्विन देठे आणि ज्ञानदेव आवारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
