संत परंपरा नामशेष झाल्यास वाईट वाटू नये:हिंदी कथाकारांच्या वाढत्या प्रभावावर अमोल मिटकरींचा इशारा, वारकरी संस्कृती धोक्यात असल्याचा दावा
![]()
महाराष्ट्राच्या शहरी भागांत सध्या उत्तर भारतीय शास्त्री आणि आचार्यांच्या हिंदी कथांचा ‘महापूर’ आला असून, यामुळे महाराष्ट्राची गौरवशाली वारकरी संत परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असे खळबळजनक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे. संतांच्या या भूमीत दांभिकता पसरवणारे आपलेच लोक असून, भविष्यात विठ्ठल संप्रदाय केवळ आठवणीत उरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली खंत व्यक्त करताना म्हटले की, “सध्या शहरी भागात हिंदी कथाकारांच्या कार्यक्रमांचे मोठे स्तोम माजले आहे. दुर्दैवाने, त्यांना डोक्यावर घेणारे आणि दांभिकता पसरवणारे आपलेच महाराष्ट्रीयन ‘ग्रेट’ भक्त आहेत. आता याचे पडसाद गावखेड्यांतही उमटू लागले असून, तिथली अस्सल संस्कृती हरवत चालली आहे.” महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या गोष्टी आता दुर्मिळ होत चालल्याचे मिटकरी यांनी नमूद केले. त्यांच्या मते काकडा आरती, हरीपाठ आणि काल्याचे कीर्तन आता कमी ऐकू येत आहे. वारकरी भजने, भारुडे आणि विराण्यांसारख्या समृद्ध कलाप्रकारांकडे दुर्लक्ष होत आहे. “जय जय रामकृष्ण हरी” या महाराष्ट्राच्या मूळ मंत्राची जागा आता इस्कॉनच्या “राधे राधे” ने घेतल्याचे अमोल मिटकरी यांनी प्रकर्षाने सांगितले. भविष्याबाबत व्यक्त केली चिंता “जर हीच परिस्थिती राहिली, तर भविष्यात ज्ञानोबा-तुकोबांची गौरवशाली संत परंपरा नामशेष झाल्यास आश्चर्य वाटू नये,” अशा शब्दांत त्यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील भक्ती मार्गाचे बाजारीकरण होत असल्याचा सूरही त्यांच्या या विधानातून उमटत आहे. राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा अमोल मिटकरी यांच्या या विधानामुळे आता धार्मिक संघटना आणि वारकरी संप्रदायातील अभ्यासकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. एका बाजूला जागतिकीकरण आणि विविध संप्रदायांचा प्रसार होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्राची मूळ ओळख जपण्याचे आव्हान मिटकरी यांनी अधोरेखित केले आहे. मिटकरींच्या या विधानावर आता वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आणि इतर धार्मिक संस्था काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… श्याम मानव यांचे आव्हान धीरेंद्र शास्त्रींनी स्वीकारले:म्हणाले – ज्यांना खाज असेल, त्यांनी दरबारात यावे; आमच्याकडील विद्येचे सादरीकरण करू पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री नागपूरच्या रेशीम बागेत 26 ते 30 एप्रिलपर्यंत श्री राम कथा करत आहेत. या दरम्यान धीरेंद्र शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्यात श्रद्धा, अध्यात्म आणि विज्ञानावरून वाद वाढला आहे. श्याम मानव यांनी 80 लाख रुपयांचे आव्हान दिले होते. हे आव्हान धीरेंद्र शास्त्री यांनी स्वीकारले आहे. सविस्तर वाचा…
