ठेकेदाराचा निष्काळजीपणा जीवावर बेतला:क्रेन अंगावर कोसळून पोलिसाचा जागीच मृत्यू, मानखुर्दमध्ये मनपाच्या कामादरम्यान घडली घटना
![]()
मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते कामात सुरक्षेचा खेळखंडोबा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मानखुर्द परिसरात सायन-पनवेल महामार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान, एक अवाढव्य ड्रिलिंग क्रेन थेट मोटारसायकलवर कोसळली. या भीषण अपघातात नेहरू नगर पोलिस ठाण्याचे हवालदार संतोष गोपाळ चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. ठेकेदाराने क्रेन उभी करताना दाखवलेला निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मानखुर्द पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायन-पनवेल मार्गाच्या उत्तर वाहिनीवर महापालिकेच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी ‘एक्साव्हेटर ड्रिलिंग क्रेन’चा वापर केला जात होता. क्रेन ज्या ठिकाणी उभी होती, तिथली जमीन भुसभुशीत होती. कामादरम्यान क्रेनचा तोल गेला आणि ही महाकाय मशीन रस्त्यावरून मोटारसायकलने (क्रमांक MH 43 W 3238) जात असलेल्या संतोष चव्हाण यांच्या अंगावर कोसळली. क्रेनचा भार इतका भीषण होता की, चव्हाण यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि सुरक्षेचा अभाव प्राथमिक तपासानुसार, संबंधित ठेकेदाराने क्रेन उभी करताना जमिनीच्या मजबुतीचा कोणताही अंदाज घेतला नव्हता. अवजड यंत्रसामग्री वापरताना पाळले जाणारे सुरक्षेचे नियम पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आले होते. क्रेन चालकाला आणि देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाची पुरेशी माहिती होती का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्याकडून संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मानखुर्द पोलिसांनी क्रेन चालक आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या जबाबदार व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रस्ते कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे कोणते उपाय योजले होते? आणि इतकी अवजड क्रेन असुरक्षित जागेवर का उभी केली? या प्रश्नांची उत्तरे पोलिस शोधत आहेत. पोलिस दलात हळहळ
मृत संतोष चव्हाण यांनी पोलिस दलात सलग २३ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. सध्या ते नेहरू नगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या अचानक जाण्याने पोलिस दलावर शोककळा पसरली असून, एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा अशा पद्धतीने अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
