मेंदी कार्यक्रमात शस्त्राचा धाक दाखवून सोनसाखळी लुटली:पुण्यात पाच आरोपींना अटक, 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त

0
f006298f-139c-4521-b33e-301585d4c94d_1777444468718.jpg




पुण्यात एका विवाह समारंभातील मेंदी कार्यक्रमात शस्त्राचा धाक दाखवून पाच लाख रुपयांची सोन्याची साखळी लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना येरवड्यातील संगमवाडी परिसरात सुनीता काची यांच्या घरी घडली. फिर्यादी नंदू अर्जुन काची (वय ५३, रा. संजयनगर, फुगेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. कार्यक्रमादरम्यान आरोपींनी नंदू काची यांना शिवीगाळ केली आणि शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांना मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या नंदू काची यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तातडीने तपास करत संतोष काची, यश काची (दोघे रा. ममतानगर, सांगवी), दत्ता रघुनाथ चव्हाण (रा. वारजे), सुशील सूर्यकांत गौड (रा. पाटील इस्टेट) आणि यश दीपक सावंत (रा. जुनी सांगवी) या पाच जणांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक मिथून सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरी दरम्यान, पुणे शहरात दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर परिसरातून एका दुकानातून एक लाख ४० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संदीप रामदास नाळे (रा. कामठे वस्ती, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नाळे यांचे हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात ‘गोल्डन बॅटरी’ नावाचे दुकान आहे. मंगळवारी (२८ एप्रिल) मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड चोरली. सकाळी दुकानाचे कुलूप तुटलेले दिसल्यानंतर संदीप नाळे यांच्या लक्षात ही चोरी आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. हडपसर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक कोलेवाड पुढील तपास करत आहेत. चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed