खते, बियाण्यांची टंचाई नको, काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करा- आमदार लंघे
![]()
नेवासे येथे तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. आगामी हंगामाच्या तयारीचा आढावा आणि बदलत्या हवामान परिस्थिती, पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि शेतकऱ्यांसमोरील विविध आव्हाने लक्षात घेता त्यावर नियोजनबद्ध व परिणामकारक तयारीवर विशेष भर देण्यात आला. खते व बियाण्यांचा तुटवडा होऊ नये तसेच काळाबाजार रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांनीही जागरूक राहावे असे आवाहन यावेळी आ. लंघे यांनी केले. शेतकऱ्यांनी शेती ओळखपत्र नोंदणीबाबत या बैठकीत सूचना देण्यात आल्या. पीकविमा योजनेची प्रभावी प्रसिद्धी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मदत वितरित करण्यात आली तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व अवजारे वाटप आमदार लंघे यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये कावेरी उमप (कृषी सखी), मोहन तुवर (कृषीभूषण) तसेच नैसर्गिक शेती करणारे गोविंद पाटील यांचा समावेश होता. तालुक्यात ठिबक सिंचन योजनेअंतर्गत १,९९८ शेतकऱ्यांना १५ कोटी रुपये, तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी २२.३४ कोटी रुपयांच्या अनुदानाची प्रक्रिया सुरू आहे. खरीप २०२५ मध्ये सोयाबीन पीकविमासाठी १६,१३६ शेतकऱ्यांना २२.६८ कोटी रुपये वितरित झाले आहेत. शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळावे, शेतीसाठी नियमित वीजपुरवठा व्हावा, तसेच पाण्याचे नियोजन मजबूत करावे आणि महाडीबीटी योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ व परिणामकारक करावी, यावरही विशेष भर देण्यात आला. या बैठकीस जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, कृषी उपविभागीय अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, कृषी तज्ञ अशोक ढगे, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी तसेच कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
