बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय? शिवसेनेत प्रवेशाची चर्चा:विधानपरिषदेसोबत विदर्भातील पक्षाचे सर्व अधिकार आणि मंत्रिपदाचीही मागणी
![]()
विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारणाला नवा ट्विस्ट मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही तासांत बच्चू कडू कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेनेतील काही नेत्यांनी बच्चू कडू पक्षात नसताना त्यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळेच ‘प्रहार’चा विलय हा पर्याय पुढे आला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याच बरोबर कडू यांच्या पक्षाकडून विदर्भातील पक्षाचे सर्व अधिकार आणि मंत्रिपदाची मागणी करण्यात आली असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, बच्चू कडू यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली असताना ते शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याची माहिती आहे. शिवसेनेकडून त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात असले, तरी स्वतःचा पक्ष विलीन करायचा की स्वतंत्र ओळख कायम ठेवायची, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचा विलय झाला, तर शिवसेनेला त्याचा थेट राजकीय फायदा होऊ शकतो. विशेषतः विदर्भ आणि अमरावती परिसरात बच्चू कडू यांचा प्रभाव मोठा मानला जातो. या भागात सध्या भाजप आणि काँग्रेसचे वर्चस्व असले, तरी बच्चू कडू यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला नवी ताकद मिळू शकते. त्यामुळे हा निर्णय केवळ एका नेत्यापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण प्रादेशिक राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो. बच्चू कडू यांची राजकीय कारकीर्दही उल्लेखनीय राहिली आहे. ते 2004 पासून अचलपूर मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. 2004, 2009, 2014 आणि 2019 या चार निवडणुकांमध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला आहे. 2019 मध्ये त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार निवडून आले होते. ठाकरे सरकारच्या काळात त्यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. जनतेत मिसळून काम करण्याची शैली सामान्य लोकांचे प्रश्न, दिव्यांगांचे हक्क आणि थेट जनतेत मिसळून काम करण्याची बच्चू कडू यांची शैली वेगळी मानली जाते. ही शैली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीशी साधर्म्य दाखवते. त्यामुळेच शिवसेना नेतृत्व बच्चू कडू यांना आपल्या गोटात आणण्यास उत्सुक असल्याचे दिसते. आता बच्चू कडू स्वतःचा पक्ष कायम ठेवतात की शिवसेनेसोबत नवा राजकीय अध्याय सुरू करतात, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
