विधानपरिषदेसाठी दिल्लीतून आदेश येताच भाजपची अर्धी यादी बाद:केवळ 14 नावांची सुधारित यादी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीला
![]()
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीत नऊ जागांसाठी मतदान होणार असून, त्यापैकी पाच जागा भाजपच्या वाट्याला येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी पक्षात जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. अनेक इच्छुकांनी आपापली ताकद लावली असून, पक्षाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीने 30 जणांची यादी तयार करून ती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. मात्र, ही यादी पाहिल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने मोठा निर्णय घेतला. या यादीतील जवळपास अर्धी नावे कमी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर राज्यातील नेतृत्वाने फेरविचार करून केवळ 14 नावांची सुधारित यादी पुन्हा दिल्लीला पाठवली आहे. त्यामुळे मूळ यादीतील कोणाची नावे वगळली गेली, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये मोठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक इच्छुक उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असून, काही जणांकडून नाराजीही व्यक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणालाही दुखावू न देता अंतिम यादी जाहीर करण्यासाठी पक्षाने विशेष खबरदारी घेतली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिलला अंतिम यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या या निवडणुकीत मुंबई वगळता राज्यातील पाच विभागांमधून उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. यावेळी पक्षाकडून जुने आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच जातीय आणि प्रादेशिक समीकरणांचा विचार करून उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंतिम पाच उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार या प्रक्रियेत महत्त्वाची बाब म्हणजे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः दिल्लीला रवाना झाले आहेत. तेथे केंद्रीय नेत्यांसोबत चर्चा करून अंतिम पाच उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. पुढील काही तासांत किंवा दिवसांत या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अंतिम यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संघटनात्मक काम करणाऱ्यांना प्राधान्य दरम्यान, संभाव्य उमेदवारांमध्ये माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे आणि संजय भेंडे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, अंतिम संधी कोणाला मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपने यावेळी निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी न देता संघटनात्मक काम करणाऱ्यांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत अनेकांना आशा आणि काहींना धक्का बसण्याची शक्यता आहे.
