प्रलंबित मागण्यांसाठी चांदवडमधीलकृषी निविष्ठा विक्री केंद्रे बेमुदत बंद:तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
![]()
कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील गेल्या ४-५ वर्षांपासूनच्या प्रलंबित अडचणी आणि मागण्यांवर शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने, राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांनी सोमवार (दि. २७) पासून बेमुदत बंद पुकारला आहे. या राज्यव्यापी आंदोलनात चांदवड तालुक्य
.
या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन चांदवड तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार अनिल चव्हाण, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशक विक्री व्यवसायातील अडीअडचणींबाबत माफदा संघटनेच्या माध्यमातून राज्याचे कृषी मंत्री, प्रधान सचिव आणि कृषी आयुक्तांकडे गेली पाच वर्षे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, कृषी विभागाकडून यावर कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे विक्रेत्यांनी अखेर बेमुदत बंदचे पाऊल उचलले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव, सरचिटणीस अभिजित शेडगे, जिल्हा प्रतिनिधी काकासाहेब भालेराव, विकास भुजाडे, राजेंद्र काळे, संतोष जामदार यांच्यासह मोठ्या संख्येने विक्रेते उपस्थित होते.
शेती औषधांवरील १८ टक्के जीएसटी कमी करून तो ३ टक्क्यांवर आणावा, तसेच रासायनिक खतांचे विक्री मार्जीन ८ टक्के दराने मिळावे, रासायनिक खतांसोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती (लिंकिंग) कंपन्यांनी बंद करावी, बियाणे किंवा औषधांचे नमुने (सँपल) दोषपूर्ण आढळल्यास विक्रेत्यांना गुन्हेगार न ठरवता केवळ साक्षीदार करावे, कारण विक्रेता हा उत्पादक नसतो. मुदत संपलेली औषधे संबंधित कंपन्यांनी परत घेणे बंधनकारक करावे, राज्य शासनाने खत विक्रीसाठी ई-पॉस मशीन द्यावे आणि खतांचा पुरवठा थेट विक्री केंद्रापर्यंत करणे बंधनकारक करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
प्रतिनिधी | दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित काळासाठी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी दिंडोरी तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष ललित जाधव, भरत जाधव, योगेश मातेरे, गणेश धुमणे, सुनील पाटील आदी उपस्थित होते. अॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने पुकारलेल्या बंदच्या निर्णयामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी केंद्र चालकांवर होणारी अन्यायकारक कारवाई, प्रशासकीय जाच आणि विविध तांत्रिक अडचणींच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. फर्टिलायझर असोसिएशनने या संपाची हाक दिली असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत दुकाने उघडणार नसल्याची भूमिका विक्रेत्यांनी घेतली आहे. कृषी विभागाकडून होणाऱ्या अनावश्यक तपासण्या आणि कारवाईला आळा घालणे, खत विक्रीच्या परवान्यांसंबंधी असलेल्या जाचक अटी शिथिल करणे, खतांसोबत इतर अनावश्यक उत्पादने (लिंकिंग) देणाऱ्या कंपन्यांच्या सक्तीवर बंदी घालणे आदी प्रमुख मागण्यांसाठी बंद पुकारला आहे. सध्या शेतीकामांची लगबग सुरू असून, खतांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. मात्र, तालुक्यातील सर्व मुख्य बाजारपेठांमधील दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. ऐनवेळी खते मिळाली नाहीत तर पिकांचे नुकसान होईल. प्रशासनाने मध्यस्थी करून हा तिढा लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, संगम देशमुख यांसह शेतकऱ्यांकडून होत आहे.
