हिंगोलीत वाळू माफीयांचे धाबे दणाणले!:वाळू तस्करी करणारा हायवा महसूल विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त
![]()
हिंगोली शहरातील खुशाल नगर भागात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनासह 15.12 लाखांचा मुद्देमाल तहसीलदारांच्या पथकाने पकडला आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात एका तरुणा विरुद्ध सोमवारी ता. 27 गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हाभरात वाळू घाटांवरून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. या सोबतच बाहेर जिल्ह्यातून विशेषतः नांदेड जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात वाळू घेऊन येणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले असून या वाहनांवरही कारवाई केली जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांची पथके स्थापन केली आहेत. या शिवाय तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची पथकेही कार्यरत आहेत. दरम्यान, सेनगाव भागातून एका वाहनामध्ये अवैधरित्या वाळू भरून वाहतूकल केली जात असून सदर वाहन हिंगोलीकडे येत असल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून भुजबळ यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास जवळा पळशी रोड भागातील खुशालनगर भागात थांबून वाहनांची तपासणी सुरु केली. यामध्ये एका हायवामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याचे दिसून आले. या पथकाने चालक सचिन सरकटे(रा. साबलखेडा,ता. सेनगाव) याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना तसेच इतर कागदपत्रे आढळून आली नाही. त्यामुळे पथकाने सदर वाहन व वाळू जप्त केली आहे. या प्रकरणी तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या तक्रारीवरून सचिन सरकटे याच्या विरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जमादार शेख पुढील तपास करीत आहेत.
