कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होताहेत हाल:दरवाढीसाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची शेतकऱ्यांची मागणी
![]()
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसर हा कांदा उत्पादनाचे आगर म्हणून ओळखला जातो. या भागातील मारडा आणि इतर गावांतील कांदा सर्वदूर ख्यात असून तो सर्वत्र विकला जातो. परंतू यावर्षी कांद्याला हवा तसा दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झालेले बघायला मिळत आहेत. शासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुढे आली आहे. कांदा लागवडीचा खर्च आणि त्यातून होणारे उत्पादन, यावर कांद्याच्या विक्रीचा भाव अवलंबून असतो. परंतू महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. कांद्याच्या बियाणांपासून तर खते, किटकनाशके, ओलीताची पाणी पट्टी व वीज बील आणि मशागतीची मजुरी इत्यादीचा खर्च काढला की, त्या शेतकऱ्यांना किती उरते हे न विचारलेलेच बरे. यावर्षी कांद्याचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह पीक घ्यावे की नको, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांचा कोणताही माल शेताबाहेर निघाला की, त्याच्या मालाला अजिबात भाव मिळत नाही. मात्र पेरणी करिता कोणत्याही वस्तू घ्यावा लागल्यास महागाई कायम आहे . पोकळ घोषणाबाजीतून शेतकऱ्यांची फसवणूक सध्या सर्वच बियाणे, खते, किटकनाशके, मशागत खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. सोबतच यासाठी लागणारी मंजूरी याचा विचार केला तर शेती करणे दिवसेंदिवस फारच अवघड होत चालले आहे. परंतू शासन मात्र कोणतीही दखल घेत नाही. सरकार पोकळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या कांदा या उत्पन्नाला योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा या भागातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
