दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशीही 46 अंशाच्या पुढे; नागरिक घरांमध्ये कैद
![]()
शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशी ४६ अंशाच्या वर कायम होते. रविवारी ४६.९ नोंदवले गेल्यानंतर सोमवारी तापमान ४६.३ अंश होते. यापूर्वीची २९ एप्रिल २०२९ रोजी अकोल्यात ४७.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. रात्री ८ वाजताही तापमान २६.५ अंशांवर रहात आहेत. दरम्यान, येथील शासकीय रुग्णालयातील (जीएमसी) उष्माघात कक्षात दोन उष्माघात सदृश रुग्ण दाखल झाले असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापण्यात आला असून त्यात १८ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वोच्च तापमानामुळे शहरात सोमवारी दुपारी उन्हाचे चटके लागत होते. प्रचंड उन्हामुळे हातपाय पोळले जात होते. त्यामुळे नागरिक घरांमध्ये कैद झाले आहेत. नागरिक डोक्याला दुपट्टा बांधून उन्हापासून बचावाचा प्रयत्न करताना दिसून आले. उन्हाची तीव्रता दुपारच्या सुमारास अधिक वाढल्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसून आले. गर्दीच्या रोडवरील वर्दळ घटलेली दिसून आली. उन्हात अडकलेले नागरिक झाडांची सावली शोधत होते. उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी घटल्याने रोडवर उभ्या मोबाइल पाणपोईवर तहान भागवताना नागरिक दिसून आले. प्रा. डॉ. सुरेश चोपने, हवामान तज्ञ कडाका राहिल कायम उष्णतेची लाट समुद्र सपाटीपासून ३.१ किमी उंचीवरील प्रति- चक्रीवादळी अभिसरणामुळे निर्माण झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. येत्या आठवड्यातही उन्हाचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. तापमान ४२ ते ४५ अंशांदरम्यान राहील. आठवड्याच्या शेवटी काही ठिकाणी हलक्या पावसाची किंवा ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याने दिलासा मिळू शकतो. उष्ण हवेमुळे तापमानात वाढ पश्चिमी विक्षोभ व वातावरणाच्या वरच्या थरात उष्ण हवेमुळे विदर्भातील तापमान सातत्याने वाढत आहे. राजस्थान व गुजरातमार्गे उष्ण वारे अकोल्यात पोहोचत आहेत. यंदा उष्ण वाऱ्यांचा प्रवास अकोलामार्गे होत आहे. त्यामुळे तापमान यावर्षी सर्वाधिक रहात आहे. दोन दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या वतीने मंगळवारपर्यंत विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच २८ ते ३० एप्रिल दरम्यान वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ५० किमी वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
