ग्रामीण भागात रब्बी पिके काढणीचे काम अंतिम टप्प्यात:उन्हामुळे शेतकरी सकाळच्या सत्रात कामे करताना दिसत आहेत, यंदा गहू, हरभऱ्याकडे कल
![]()
जालना तालुक्यात गेल्या महिनाभरापासून रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची लगबग सुरू झाली असून सध्या मळणीयंत्रातून काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पाण्याची उपलब्धता पाहता अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून मका, हरभरा, ज्वारीची पेरणी केली होती. त्यामुळे आ
.
जालना तालुक्यात यंदा झालेल्या जोरदार पावसाने खरीपाचे मोठे नुकसान केले असले तरी रब्बीला मोठा फायदा झाला आहे. पाणीपातळीत झालेल्या वाढीमुळे यंदा रब्बीच्या पेरणीत ८ हजार ५०० हेक्टरने वाढ झाली होती. तालुका कृषी विभागाच्या अंतिम अहवालानुसार सन २०२५-२६ मध्ये जालना तालुक्यात एकूण ३८ हजार ५१३ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारीचे १२ हजार ३६६ हेक्टर, गव्हाचे १० हजार ३७९ हेक्टर, हरभऱ्याचे १५ हजार ३५६ हेक्टर, मक्याचे ३१० हेक्टर, इतर कडधान्यांचे ६८ हेक्टर, मोहरीचे २० हेक्टर, इतर गळीतधान्यांचे १३ हेक्टर, तर करडईचे १ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सूर्यफूल, तीळ व ऊस या पिकांचा पेरा नगण्य राहिला आहे. यंदा हरभरा आणि गहू या पिकांकडे शेतकऱ्यांचा मोठा कल दिसून आला होता. दोन्ही पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले होते. सिंचन सुविधा, सुधारित बियाणे, अनुकूल हवामान, बाजारभावाची अपेक्षा यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांना प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.
काही भागात ज्वारीचाही चांगला पेरा झाला आहे. बाजारात ज्वारीला ४ हजाराच्या वर दर मिळत आहे. तर चार्यालाही ३ हजारच्या वर दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, सध्या हरभरा, गहू आणि ज्वारी पिकांच्या काढणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. शेतकरी मळणी, साठवणूक, विक्रीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. काढणीसाठी मजुरांची मागणी वाढली असून अनेक ठिकाणी हार्वेस्टर व आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर होत आहे.
