खत-बियाण्यांचा साठा पुरेसा ठेवा, काळ्या बाजारावर कारवाई करावी:आ. सत्तारांच्या उपस्थितीत बैठक, पीक आराखडा तयार ठेवण्याचे आवाहन‎

0
240_177720381869edfa6aa814b_47964919782.jpg




प्रतिनिधी | सिल्लोड कृषी विभागाने प्रमाणित बियाणे, खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. खतांची टंचाई होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. चढ्या दराने खत, बियाणे विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करावी. बोगस साहित्य विकणाऱ्यांवरही कडक कारवाई करावी. यासाठी टास्क फोर्स तयार करावा, असे त्यांनी सांगितले. पात्र शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत पीक कर्ज द्यावे. शेतकऱ्यांची कुठेही अडवणूक होणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. नगर परिषदेच्या सभागृहात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व तालुकास्तरीय नियोजन व आढावा बैठक झाली. बैठकीत नगराध्यक्ष अब्दुल समीर, तहसीलदार अंकिता ताकभाते, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, पोलिस निरीक्षक शेषराव उदार, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे आदी उपस्थित होते. खतांचा अवाजवी साठा, विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश सत्तार यांनी दिले. नॅनो युरियाच्या वापरावर भर द्यावा. शेतकऱ्यांमध्ये त्याबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले. कमी खर्चिक शेती पद्धतींचा विस्तार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. खरेदी करताना पावती घ्या ः शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खत खरेदी करताना अधिकृत, ओरिजिनल पावती घ्यावी, असे आवाहन सत्तार यांनी केले. बोगस बियाणे, चढ्या दराने विक्री, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनीही जागरूक राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी पथके सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed