भारतीय विद्यापीठ संघाची 100 वी वार्षिक सभा पुण्यात:राज्यपालांच्या हस्ते उद्या उद्घाटन; 400 कुलगुरू सहभागी होणार
![]()
भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘भारतीय विद्यापीठ संघाची’ (AIU) १०० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद यंदा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) या परिषदेचे यजमानपद भूषवत आहे. हा शैक्षणिक सोहळा २८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत संपन्न होईल. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या AIU चे हे शताब्दी वर्ष असल्याने या सभेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या तीन दिवसीय परिषदेचा मुख्य विषय ‘ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे’ असा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते मंगळवारी, २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या परिषदेत देशभरातील ४०० हून अधिक विद्यापीठांचे कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. एकूण ३४ मान्यवर व्याख्याते विविध समकालीन विषयांवर विचारमंथन करतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, स्वदेशी आणि आर्थिक राष्ट्रवाद, स्टार्टअप्स, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि ‘विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक २०२५’ यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर यात चर्चा होणार आहे. या निमित्ताने भारतीय विद्यापीठ संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर आधारित ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज: अ सेंचुरी ऑफ इव्होल्यूशन ट्रान्सफॉर्मेशन अँड लीडरशिप’ या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल. तसेच, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे विशेष व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे. परिषदेच्या सांगता समारंभासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी हा ‘शैक्षणिक महाकुंभ’ भारताच्या शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील आणि डॉ. सोमनाथ पाटील यांनी ही परिषद स्टार्टअप्स आणि संशोधनाच्या माध्यमातून विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नवी पायरी ठरेल, असे नमूद केले.
