बुटीबोरी एमआयडीसीत 9 बालकामगारांची सुटका:धोकादायक परिस्थितीत काम करून घेणाऱ्या संचालकांसह चौघांवर गुन्हे दाखल
![]()
बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील नारायणा फॅक्टरीतून धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या नऊ बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. यात चार मुली आणि पाच मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी फॅक्टरीच्या संचालकांसह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते राकेश भलावी यांनी तक्रार केल्यानंतर प्रशासन आणि बाल संरक्षण पथकाने तातडीने छापा टाकून ही कारवाई केली. छाप्यादरम्यान समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. अल्पवयीन मुलांकडून फॅक्टरीमध्ये मोठ्या मशीनवर काम करून घेतले जात होते. तसेच, केमिकल आणि आरोग्यास घातक वातावरणात त्यांना काम करण्यास भाग पाडले जात होते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती. मुलांच्या राहण्याची व्यवस्थाही अत्यंत निकृष्ट आणि अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय, बाहेरच्या राज्य आणि जिल्ह्यातील मुलांना आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात असल्याचेही उघड झाले आहे. छाप्यादरम्यान काही मुले बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या प्रकरणी फॅक्टरीचे संचालक आणि इतर संबंधित चार जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई बुटीबोरी पोलिसांच्या सहकार्याने पार पडली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मोरे, तक्रारदार राकेश भलावी, तसेच चाईल्ड लाईन प्रतिनिधी पूजा कांबळे, मेघा पाटील आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या रूपाली वानखेडे, अश्विनी चौरे यांचा सहभाग होता. तपासादरम्यान असेही आढळून आले की, फॅक्टरीमध्ये कामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन होत होते. कोणत्याही कामगारांकडे नियुक्ती आदेश नव्हते, कामाचे ठराविक तास नव्हते आणि अल्पवयीन मुलांना धोकादायक उद्योगात कामाला लावून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला जात होता. बालकामगारांना धोकादायक उद्योगांमध्ये कामाला लावणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या बालकामगारांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार असून, त्यांच्या पुनर्वसनाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.
