सातारा गुन्हेगारी वृत्त:कण्हेर येथे देशी दारूवर पोलिसांचा छापा; 44 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त
![]()
सातारा तालुक्यातील मौजे कण्हेर गावच्या हद्दीत कण्हेर ते जांभळेवाडी जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत पोलिसांनी छापा टाकून देशी दारूचा साठा जप्त केला. गुरव यांच्या शेतजमिनीलगत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी दारू (संत्रा)च्या ९० मिलीच्या बाटल्यांचा साठा, ज्याची एकूण किंमत ४४ हजार ६०० रुपये आहे, तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी सतीश बजरंग वाघमळे (वय ४६, रा. कण्हेर, ता. जि. सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार विद्या कुंभार करत आहेत. साताऱ्यातील शनिवार पेठेतून दोन महिला बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल सातारा शहरातील शनिवार पेठेतील तेली खड्डा परिसरातून दोन महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आफरीन मुन्ना शेख (वय २८) आणि झैनब सलमान खान (रा. शनिवार पेठ, तेली खड्डा, सातारा) या दोघी आपल्या राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता अज्ञात ठिकाणी निघून गेल्या आहेत. त्या अद्याप घरी परत न आल्याने त्यांचे वडील मुन्ना लतीफ शेख (वय ५८) यांनी पोलिसांकडे धाव घेत मिसिंगची तक्रार नोंदवली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करत असून, दोघींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कण्हेर डाव्या कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू; सातारा तालुक्यातील घटना सातारा तालुक्यातील मौजे आरळे येथे कण्हेर डाव्या कालव्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २५ तारखेला दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. प्रवीण प्रकाश देशमुख (वय ३०, रा. बसपाची वाडी, ता. जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ते कालव्याच्या पाण्यात पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या प्रकरणाची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करत आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राजयोग हॉटेल पार्किंगमधून दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल सातारा शहरातील राजयोग हॉटेलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि २६ रोजी सकाळी ९ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे २५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. अज्ञात चोरट्याने पार्किंगमधून ही दुचाकी चोरून नेली. याबाबतची फिर्याद सचिन सदाशिव चौधरी (वय ४४), व्यवसायाने हॉटेल मॅनेजर, रा. संभाजीनगर ग्रामपंचायत समोर, ता. जि. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी करून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
