नीलम गोऱ्हेंना पुन्हा उमेदवारी नको!:पुणे शिवसेना महिला आघाडीचा एकनाथ शिंदेंना 'लेटर बॉम्ब'; पत्रात गंभीर आरोप
![]()
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांपैकी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून नीलम गोऱ्हे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी थेट मागणी केली आहे. या पत्रामुळे पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून, उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीने पाठवलेल्या या पत्रात नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांनी पक्ष संघटनेसाठी काम करण्याऐवजी महिला कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यावरच भर दिल्याचे म्हटले आहे. महिलांचे चारित्र्यहनन करणे आणि त्यांच्यात आपापसात भांडणे लावून संघटनेचे मोठे नुकसान केल्याचा ठपका या पत्रात ठेवण्यात आला आहे. आपल्याला पुन्हा आमदार करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला असल्याचा दावा नीलम गोऱ्हे कार्यकर्त्यांकडे करत आहेत, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्रात पुढे असा इशारा देण्यात आला आहे की, नीलम गोऱ्हे यांच्याऐवजी एखाद्या सामान्य शिवसैनिकाला संधी दिल्यास कार्यकर्ते तुमचे स्वागत करतील. अन्यथा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच तुमचीही एका महिलेने फसवणूक केली, असे म्हणावे लागेल. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या या पत्रावर कोणत्याही विशिष्ट पदाधिकाऱ्याचे नाव किंवा दिनांक नसून, ते केवळ ‘पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी’ या नावाने पाठवण्यात आले आहे. या निनावी पत्रामुळे आता शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, विधान परिषदेची एक जागा जिंकण्यासाठी 28 मतांच्या कोट्याची आवश्यकता असून, सध्याचे पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे पारडे जड असल्याचे दिसून येते. भाजप (131 आमदार), शिवसेना शिंदे गट (57 आमदार) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (40 आमदार) अशा एकूण संख्याबळाच्या जोरावर महायुतीचे 8 उमेदवार तांत्रिकदृष्ट्या सहज निवडून येऊ शकतात. याउलट, महाविकास आघाडीकडे 46 आमदारांचे संख्याबळ असल्याने त्यांचा एक उमेदवार आरामात निवडून येईल. मात्र दुसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या अतिरिक्त 10 मतांची बेरीज करणे महाविकास आघाडीसाठी सध्याच्या राजकीय परिस्थितीत मोठे आव्हान ठरणार आहे.
