एचपीव्ही लसीकरणाने कॅन्सर टाळता येतो‎:डॉ. विकास नेहटकर यांचे गर्भाशय मुखाचा कॅन्सरवर मार्गदर्शन‎

0
240_177651186469e36b78c822d_hvpinjection.jpg




गर्भाशयाचा कॅन्सर हा जगातील कॅन्सरपैकी दुसऱ्या क्रमांकावर आढळणारा गंभीर आजार असून, एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाद्वारे हा कॅन्सर टाळता येऊ शकतो, असे प्रतिपादन आयुष्मान आरोग्य मंदिर, शिरजगाव बंड येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नेहटकर यांनी केले. ज्ञानोदय विद्यामंदिर येथे आयोजित पालक-विद्यार्थी-शिक्षक-कर्मचारी यांच्या सभेत ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डकरे तसेच तळवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. नेहटकर (सीएचओ) व सारिका सातव (आरोग्य सेविका) यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. एचपीव्ही विषाणू हा गर्भाशयाच्या कॅन्सरचा प्रमुख कारणीभूत घटक आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यभर एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली ही लस सुमारे ४ हजार रुपये किमतीची असून, १४ ते १५ वयोगटातील मुलींना ती शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत दिली जात आहे. जगातील सुमारे १५० देशांमध्ये हे लसीकरण सुरू असून, ५० देशांमध्ये मुलांनाही ही लस दिली जाते. आतापर्यंत जगभरात सुमारे ५० कोटी महिलांनी ही लस घेतली आहे. या मोहिमेदरम्यान लस घेतलेल्या मुलींना कोणताही गंभीर त्रास झाला नसल्याचेही डॉ. नेहटकर त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पालकांनी कोणताही संकोच न बाळगता आपल्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने ही लस जवळच्या आरोग्य केंद्रात घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळेस केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित पालकांनी आपल्या मुलींना लस देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच ही लस इतर वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठीही मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती खांडे, आरोग्य सेवक अशोक जावरे, आशा सेविका अर्चना यादव, सोनाली गणोरकर कर्मचारी उपस्थित होते.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks