पावसाळ्यापूर्वी फिडर सेपरेशन पूर्ण करा; वीजपुरवठा होणार सक्षम
![]()
अकोला महावितकरण कंपनीच्या अकोला परिमंडळात सुरू असलेल्या फिडर सेपरेशनच्या कामामुळे वीज पुरवठ्याच्या गुणवत्तेत सुधारणा होवून वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार असून या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्य अभियंता . राजेश नाईक यांनी दिले आहेत. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.विद्युत भवन येथे झालेल्या पायाभूत आराखडा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी फिडरनिहाय कामाचा आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता दिपक सोनोने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यामिनी पिंपळे, तसेच विभागातील क्षेत्रीय सहाय्यक अभियंते आणि कंत्राटदार एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करत मुख्य अभियंत्यांनी कंत्राटदारांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या. तसेच दर आठवड्याला प्रगती आढावा बैठक घेण्याचे निर्देशही देण्यात आले. असा होतोय खर्च आरडीएसएस योजनेअंतर्गत अकोला परिमंडळात कृषी व गावठाण फिडरचे विलगीकरण करण्यात येत असून या कामासाठी एकूण २६५.८४ कोटी रुपयांचा खर्च होत आहे. या प्रकल्पात १७८ नवीन फिडर उभारले जात असून २५२९ किमी नवीन वीजवाहिन्या, ९६ किमी भूमिगत केबल, १६४ किमी लघुदाब वाहिन्या, ९५ एसडीटी आणि ७७१ नवीन वितरण रोहित्रांची उभारणी केली जात आहे. फिडरची लांबी कमी होऊन वितरणातील वीज हानीत लक्षणीय घट होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज उपलब्ध होणार असून इतर ग्राहकांना २४ तास अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा देणे शक्य होणार आहे, असा दावा आहे. अशी आहे फिडरची संख्या परिमंडळातील १७८ फिडरपैकी अकोला जिल्ह्यात ९६ फिडर असून त्यापैकी ३७ कार्यान्वित झाले आहेत, २० पूर्ण झाले असून ३९ प्रगतीपथावर आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ६३ फिडरपैकी ४३ कार्यान्वित, ६ पूर्ण व १४ प्रगतीपथावर आहेत. वाशिम जिल्ह्यातील १९ फिडरपैकी ५ कार्यान्वित, ४ पूर्ण व १० फिडरचे काम सुरू आहे. एकूणच, फिडर सेपरेशन प्रकल्पामुळे अकोला परिमंडळातील वीज पुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि गुणवत्तापूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
