पुणे जिल्हा परिषदेत लाच घेताना दोघांना रंगेहात पकडले:सहाय्यक प्रशासन अधिकारी, दोन कनिष्ठ सहायकांविरोधात 3 लाखांची लाच मागितल्याचा गुन्हा

0
3f2754a8-bc98-479a-a857-978c72ac031c_1775538001789.jpg




पुणे, प्रतिनिधी- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील तीन कर्मचाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. उपशिक्षक पदावर पदोन्नतीसाठी 3 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणात एक सहाय्यक प्रशासन अधिकारी आणि दोन कनिष्ठ सहायकांचा समावेश आहे. तक्रारदार (वय 36) हे जिल्हा परिषद पुणे येथे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची उपशिक्षक पदावर पदोन्नती होण्यासाठी प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी आणि जात वैधता प्रमाणपत्र नसतानाही अधिसंख्य पदावर वर्ग करून सेवा व निवृत्ती लाभ मिळवून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार 6 जानेवारी 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीनंतर 11 फेब्रुवारी 2026 रोजी पडताळणी करण्यात आली. यामध्ये आरोपींनी 3 लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी यापूर्वीच 25 हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले होते आणि उर्वरित 2 लाख 75 हजार रुपयांची मागणी कायम ठेवली होती. या माहितीच्या आधारे नुकताच सापळा रचण्यात आला. बी.टी. कवडे रोड, हडपसर येथील 93 एव्हेन्यू मॉलसमोर सायंकाळी 4.59 वाजता तक्रारदाराकडून 2 लाख 75 हजार रुपये स्वीकारताना अनिल रंधवे आणि अतिश शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेश खंदारे यांनाही ताब्यात घेण्यात आले. या तिन्ही आरोपींविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांच्या पथकाने, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकृत शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास तत्काळ ॲन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed