मनोज जरांगेंचा फडणवीस-विखेंना थेट इशारा:आम्ही वारंवार आंदोलन करायचं आणि सरकारने हलक्यात घ्यायचं?; मराठा-ओबीसी दरी वाढवण्याचा प्रयत्न का केला जातोय?

0
1_1781083155.jpg




मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात निर्णय घेतले जात नाहीत, असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना थेट इशारा दिला आहे. “आम्ही वारंवार आंदोलन करायचं आणि सरकारने आम्हाला हलक्यात घ्यायचं, असे असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांना पुढचा काळ जड जाईल,” असे जरांगे पाटील यांनी बीड येथे माध्यमांशी बोलताना म्हटले. “मराठा समाजाचा वारंवार अवमान होतोय” जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारकडून सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. “मराठा समाजाचा वारंवार अवमान केला जात आहे. हे असेच सुरू राहिले तर 2029 च्या निवडणुकीत मराठा समाज त्याचा हिशेब चुकता करेल. समाजाचा अवमान करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी सरकारला थेट सवाल करत म्हटले की, “हैदराबाद गॅझेटमधील नोंदी उपलब्ध आहेत, ऐतिहासिक पुरावे आहेत, तरीही आरक्षण का दिले जात नाही? तुम्ही नेमके कुणाला घाबरून हे करत आहात?” “आम्ही ओबीसींच्या आरक्षणातून हिस्सा मागत नाही” मराठा आणि ओबीसी समाजामध्ये निर्माण होत असलेल्या वादावरही जरांगे पाटील यांनी भाष्य केले. “आम्ही ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून आम्हाला द्या, असे कधीच म्हणालो नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. आमच्या नोंदी असतील तर आम्हाला आरक्षण देण्यात अडचण काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी दावा केला की, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या होत्या. मात्र काही अधिकाऱ्यांनी त्या नोंदी हटवल्याचा आरोप त्यांनी केला. “नोंदी हटवण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना कोणी दिला?” जरांगे पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले की, “वडवणीतील तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोंदी हटवल्या आहेत. नोंदी हटवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? याची चौकशी झाली पाहिजे.” सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. मराठा-ओबीसी दरी वाढवण्याचा प्रयत्न? “मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जातोय, हे समजत नाही. स्वतःला तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या लोकांनाही ही बाब का समजत नाही?” असा सवाल करत जरांगे पाटील यांनी दोन्ही समाजांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. त्यांनी पुन्हा स्पष्ट केले की, मराठा समाजाची मागणी ही स्वतंत्र हक्काची असून कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर अतिक्रमण करण्याची नाही. जखमी मराठा सेवकाची घेतली भेट मनोज जरांगे पाटील हे बीड दौऱ्यावर असताना त्यांनी आंदोलनादरम्यान अपघातात जखमी झालेल्या एका मराठा सेवकाची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. अंतरवली सराटी येथील आंदोलनातून परतताना या कार्यकर्त्याचा अपघात झाला होता. त्याच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर निशाणा साधला. गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात अनेक आंदोलने झाली आहेत. सरकारने विविध निर्णय आणि समित्यांच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असला, तरी मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्ते अद्याप समाधानी नसल्याचे दिसून येत आहे. जरांगे यांच्या ताज्या इशाऱ्यांमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, सरकार यावर पुढे कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed