चहा घेऊन येणाऱ्या 4 तरुणांवर काळाचा घाला:भरधाव वेगातील कार झाडाला धडकली, अमरावती – अकोला महामार्गावर रात्री घडली घटना
![]()
अमरावती – अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण अपघात झाला. त्यात चहा घेऊन परत येणाऱ्या 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, बेलोरा विमानतळाजवळ घडली. मृत्यूमुखी पडलेले सर्व तरुण बडनेराच्या जुनी वस्ती परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा येथील 7 तरुण सोमवारी उशिरा रात्री चहा पिण्यासाठी बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चहा घेऊन ते परत येत असताना त्यांच्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर वेगात धडकली. या अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की, कारमधील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 4 जण जागीच ठार, 3 गंभीर या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे मोहम्मद अनस मोहम्मद सईद (20), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (22), मोहम्मद अवेझ मोहम्मद सईद (26) व अब्दुल अनवेस अब्दुल सलीम (22) अशी आहेत. हे सर्वजण बडनेरा जुनी वस्ती परिसरातील रहिवासी होते. एकाच भागातील चार तरुणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत उर्वरित तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने अमरावती येथील बडनेरा रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघातात ट्रकचा सहभाग असल्याची माहिती या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले व पुढील कारवाई सुरू केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकल्यामुळे हा अपघात झाला असावा, असे पोलिसांचे मत आहे. पण या अपघातात एका ट्रकचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस त्या अंगानेही या अपघाताची चौकशी करत आहेत. त्यांनी फरार ट्रक चालकाचा शोध सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे बडनेरा व आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण वयातच 4 तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बडनेरा पोलिसांनी मंगळवारी पहाटे या या अपघाताची नोंद करत पुढील तपास सुरू आहे. फरार ट्रकचालकाचा शोध घेणे व अपघातामागील नेमकी कारणे शोधणे हे सध्या पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.
