जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट:महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण, राज्यभरातून हळहळ व्यक्त
![]()
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ग्रेनेड स्फोट झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आल्याची माहिती आहे. नवी मुंबई आणि साताऱ्यातील दोन्ही जवानांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरच्या कमलकोट भागात मंगळवारी सायंकाळी अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला. या दुर्घटनेत भारतीय लष्करातील दोन जवान गंभीर जखमी झाले. स्फोटाची माहिती मिळताच सहकारी जवानांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत दोघांना श्रीनगरमधील बदामीबाग येथील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही दोघांचे प्राण वाचू शकले नाहीत. गावांमध्ये शोककळा या दुर्घटनेत हुतात्मा झालेले जवान नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी होते, तर दुसरे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शाहपूर गावचे होते. दोघेही देशसेवेसाठी कर्तव्य बजावत असताना वीरमरण पावल्याने त्यांच्या मूळ गावांमध्ये शोककळा पसरली आहे. नातेवाईक, ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट अपघाताने झालेल्या ग्रेनेड दुर्घटनेमुळे झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमके कारण शोधण्यासाठी लष्कराकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. आवश्यक लष्करी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही जवानांचे पार्थिव पूर्ण लष्करी इतमामात त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात येणार आहे. देशसेवेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानांना सर्व स्तरांतून आदरांजली वाहिली जात आहे. मनोज जरांगेंचा फडणवीस-विखेंना थेट इशारा: आम्ही वारंवार आंदोलन करायचं आणि सरकारने हलक्यात घ्यायचं? मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात निर्णय घेतले जात नाहीत, असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना थेट इशारा दिला आहे. सविस्तर वाचा
