[ads1]
![]()
जायखेडा ग्रामपंचायतीच्या विकासकामांत झालेल्या कथित आर्थिक व तांत्रिक गैरव्यवहाराच्या चौकशीने आता निर्णायक वळण घेतले आहे. केवळ शासकीय फायलींपुरती मर्यादित राहिलेली ही चौकशी अखेर गुरुवारी थेट ‘ग्राऊंड झिरो’वर पोहोचली. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नेमलेल्या तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकाने गावात तळ ठोकून विकासकामांची इंचा-इंचावर प्रत्यक्ष मोजणी सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांत १५ वा वित्त आयोग, ग्रामविकास निधी आणि दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जायखेड्यात रस्ते, पेव्हर ब्लॉक, भूमिगत व उघड्या गटारी तसेच संरक्षण भिंतींच्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला होता. ही बहुतांश कामे कागदोपत्री ‘पूर्ण’ दाखवून शासकीय निधी लाटल्याचा आणि प्रत्यक्षात कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा थेट आरोप उपोषणकर्त्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नेमलेले तांत्रिक पथक आता सर्व प्रभागांत फिरून कामांची लांबी, रुंदी आणि जाडी प्रत्यक्ष मोजत आहे. केवळ मोजणी न करता, बांधकामात वापरलेले सिमेंट-वाळूचे प्रमाण, साहित्याचा दर्जा आणि कामाच्या वेळी अपलोड करण्यात आलेल्या जुन्या ‘जिओ-टॅग’ फोटोंची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी केली जात आहे. ग्रामस्थांचा तीव्र विरोध, आंदोलने आणि उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने हे पाऊल उचलल्याने मोजणीदरम्यान ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती. हा संपूर्ण मोजणी अहवाल गोपनीय पद्धतीने थेट वरिष्ठांकडे सोपवला जाणार आहे. हा आंदोलनाचा पहिला विजय ^ तज्ज्ञ अभियंते स्वतः मोजणी करत आहेत, हा आंदोलनाचा पहिला विजय आहे. ही चौकशी राजकीय दबावाशिवाय पारदर्शक व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी.- बापूजी मोगरे, उपोषणकर्ते, जायखेडा. दिवसभरात ३२ कामांचे मोजमाप पूर्ण उपोषकर्ते बापू मोगरे यांनी गुरुवारी तपासणीसाठी आलेल्या तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकाकडे एकूण ४५ कामांची यादी सुपूर्द केली होती. या यादीच्या आधारे अभियंत्यांनी दिवसभर घटनास्थळी थांबून कामांची प्रत्यक्ष मोजणी केली. दिवसभरात बहुतांश कामांची तांत्रिक पडताळणी पूर्ण झाली असली, तरी त्यातील १३ कामांचे मोजमाप करणे वेळेअभावी बाकी राहिले होते. ग्रामपंचायतीच्या चौकशीत पुढे आलेल्या विकासकामांचा आकडा मोठा असून, गावात अशा अनेक कामांचा डोंगरच उभा आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन इंचा-इंचाची मोजणी करणे, साहित्याची गुणवत्ता तपासणे आणि कागदपत्रांशी ताळमेळ घालणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील कामांचे मोजमाप एका दिवसात पूर्ण होणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
[ads2]
जायखेड्यात कोट्यवधींच्या कामांची इंच-इंचावर मोजणी:तज्ज्ञ अभियंत्यांकडून गैरव्यवहाराची चौकशी सुरू
















Leave a Reply