अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी:कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमसभेत ठराव मंजूर, शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी.

[ads1]


अमरावती आणि भातकुली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अपुरा आणि खंडित पाऊस झाल्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा, असा ठराव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने मंजूर केला आहे. दुष्काळ जाहीर करून उपाययोजना लागू करण्याची मागणीही या ठरावात करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरिभाऊ मोहोड यांनी हा प्रस्ताव मांडला, ज्याला सभेतील सर्वांनी पाठिंबा दिला. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा सभापती हरिश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली १९ सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात झाली. या सभेत शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक विषयांवर चर्चा झाली. यंदा भातकुली आणि अमरावती तालुक्यात खूप कमी पाऊस झाला आहे. दोनवेळच्या किरकोळ पावसात मोठा खंड पडल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांची उत्पादन क्षमता ७० टक्के किंवा त्याहून अधिक कमी झाली आहे. कापणी आणि मळणीचा खर्चही निघेल की नाही, अशी चिंताजनक परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हरिभाऊ मोहोड यांनी दुष्काळ आणि नुकसान भरपाईबाबत महत्त्वाचे ठराव मांडले. या ठरावांना आमसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. या ठरावानुसार, सरकारने संपूर्ण जिल्ह्यात तातडीने ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. महसूल आणि कृषी विभागाच्या पंचनाम्याची वाट न पाहता, बाधित सोयाबीन, मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दसरा-दिवाळी सणांपूर्वी ५० टक्के रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम २० ऑक्टोबरपूर्वी वितरित करावी, असेही या ठरावात म्हटले आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *