राजापेठच्या शहीद भगतसिंग मंडळाने दिला निकोप आरोग्याचा मंत्र:77 वर्षांची परंपरा, कला-संस्कृतीसह जगन्नाथपुरी मंदिराचा देखावा साकारला

[ads1]


अमरावती येथील राजापेठच्या शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने यावर्षी खेळांना प्राधान्य देत निकोप आरोग्याचा मंत्र दिला आहे. हे मंडळ सलग 77 वर्षांपासून कला, संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत आहे. त्यामुळे वर्षभर या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक हित जपले जाते. गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता तो सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा, कला, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा उत्सव व्हावा, यासाठी शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळ विविध उपक्रम राबवते. यावर्षी सादर झालेल्या मल्लखांब प्रात्यक्षिकांमुळे मंडळाच्या क्रीडा प्रतिबद्धतेचा अनुभव आला. देखाव्याच्या उद्घाटनाच्या दिवशी मल्लखांब खेळाडूंनी आकर्षक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. खेळाडूंनी सादर केलेल्या विविध चित्तथरारक कसरतींना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. पारंपरिक भारतीय खेळ आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटक भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी कौतुक केले. मल्लखांबच्या प्रात्यक्षिकानंतर ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. यात मंडळाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. नवनीत राणा यांनीसुद्धा ढोल-ताशाच्या पथकासोबत ढोल वाजवून आनंद घेतला. यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, मनपा शहर सुधार समितीच्या सभापती राधा कुरील, नगरसेवक प्रशांत वानखडे, नगरसेविका नंदा सावदे, नगरसेवक योगेश विजयकर, सुनिल खराटे, ललीत समदुरकर, राजु कुरील आणि मंडळाचे अध्यक्ष अनुप अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावर्षी मंडळाने देखाव्याच्या बाबतीतही विशेष लक्ष दिले आहे. जगन्नाथपुरी येथील मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यामुळे दररोज नागरिक आणि गणेशभक्तांची मोठी गर्दी येथे होत आहे. अमरावतीत पहिल्यांदाच एखाद्या मंडळाने जगन्नाथपुरीचा देखावा साकारला आहे. मंडळाने हा देखावा साकारून अमरावतीकरांना धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या आगळीवेगळी अनुभूती दिली आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *