पुणे-सोलापूर महामार्गावर पोलिसाला भरधाव वाहनाची धडक:सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे यांचा जागीच मृत्यू, उरुळी कांचनमध्ये हिट अँड रनची घटना

[ads1]


पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन हद्दीत भरधाव अज्ञात वाहनाने पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार गणेश रतन दाभाडे (वय 49) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीकृष्ण मंगल कार्यालय आणि हॉटेल ग्रीन पार्क परिसरात ही घटना घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, गणेश दाभाडे हे पोलीस ठाण्यातील शासकीय काम पूर्ण करून बाहेर पडले होते. रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ते पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत होते. याचवेळी सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दाभाडे रस्त्यावर दूरवर फेकले गेले. त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर वाहनचालकाने वाहन न थांबवता तेथून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दाभाडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सीसीटीव्हीच्या आधारे वाहनाचा शोध अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी महामार्गावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील टोलनाके, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयित वाहनाची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. 2001 मध्ये पोलीस दलात भरती गणेश रतन दाभाडे हे मूळचे धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील रहिवासी होते. सन 2001 मध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी सेवा बजावली. सहकाऱ्यांच्या माहितीनुसार, दाभाडे हे शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावाचे होते. कर्तव्य बजावताना त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ते पोलीस दलात परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर दाभाडे यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांच्या मूळ गावी तसेच सहकाऱ्यांमध्ये शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि कुटुंबीय असा परिवार आहे. कर्तव्यावर असतानाच झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी दाभाडे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. कर्तव्य बजावत असलेल्या सहकाऱ्याला अशा प्रकारे गमावणे अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे-सोलापूर महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर या घटनेमुळे उरुळी कांचन परिसरातील पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अनेक वाहने वेगाने धावत असल्याने पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडणे धोकादायक ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी पथदिव्यांची पुरेशी व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे प्रमाण वाढते. तसेच पादचाऱ्यांसाठी सुरक्षित भुयारी मार्ग किंवा पादचारी पूल उपलब्ध नसल्याने नागरिकांना थेट महामार्ग ओलांडण्याची वेळ येते. त्यामुळे अशा ठिकाणी वेग नियंत्रण, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांनी ब्लॅक स्पॉटची पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रभावी यंत्रणा, सीसीटीव्ही देखरेख, पुरेसे पथदिवे आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र क्रॉसिंगची व्यवस्था केल्यास अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते. दरम्यान, गणेश दाभाडे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेणे हे पोलिसांसमोरचे प्रमुख आव्हान आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे वाहनचालकापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. हेही वाचा… 13 तालुकाप्रमुखांना कार,शिंदे गटाच्या आमदाराचा नवा फॉर्म्युला:जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी शिवसेनेची तयारी, गावागावांत संपर्क वाढवणार नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नवी रणनीती आखली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पक्षाचा संपर्क वाढवण्यासाठी जिल्ह्यातील 13 तालुकाप्रमुखांना नव्या कोऱ्या कार देण्यात येणार आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने या 13 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *