वसमतमधील अभिजीत शहाणे खून प्रकरणाचा 60 तासांत छडा:दोघांना अटक, तिसऱ्याच्या शोधासाठी पोलीस पथक तेलंगणात

[ads1]


वसमत शहरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या जागेमध्ये अभिजीत शहाणे खून प्रकरणाचा वसमत पोलिसांनी अवघ्या 60 तासात छडा लावला असून या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य एकाच्या शोधासाठी पोलिसांनी तेलंगणा राज्यात शोध मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत शहरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाच्या जवळ एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी ता 18 मिळाली होती. त्यावरून वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे, सय्यद इमरान यांच्यासह पोलिसांच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी एका 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाच्या चेहऱ्यावर तसेच शरीरावर दगडाने मारल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी परिसरात माहिती घेतली असता सदरील मृतदेह अभिजीत शहाणे (30 रा वसमत ) याचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान मयत अभिजीत हा एका दुकानावर कामगार म्हणून काम करत होता. गुरुवारी ता 17 दुपारी एक वाजता तो कामावरून घरी निघाला. मात्र तो घरी पोहोचलाच नाही. त्यानंतर शुक्रवारी ता 18 त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, गुन्हे शाखेची निरीक्षक मोहन भोसले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाला आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, जमादार बी. जी. म्हात्रे, संदीप सुरोशे, नागोराव बाभळे, नितीन रामदिनवार, अशपाक शेख, गजानन भोपे यांची पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने वसमत शहरात तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रातील एकाची माहिती घेतली. मात्र त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे पुन्हा एकदा वसमत शहरात हलवली. यामध्ये आवश्यक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वसमत शहरातून जय थोरात, गुलफार पठाण या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे. तर या प्रकरणात अन्य एकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथक तेलंगणात रवाना झाले असून त्या ठिकाणी रविवारी ता 20 पहाटेपासून शोध मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत तीन ते चार ठिकाणी छापे मारून पाहणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या जागेत दारू पिण्यासाठी बसण्याचे कारणावरून बाचाबाची झाली व त्यातून खूनाचा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तेलंगणातून तिसऱ्या संशयतांच्या अटकेनंतरच त्यांची सखोल चौकशी केली जाणार असून त्यानंतरच या खूनाचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *