नागपूरच्या इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचे नाव:देवेंद्र फडणवीस-नितीन गडकरींच्या उपस्थितीत लोकार्पण

[ads1]


नागपूरमधील इंदोरा ते दिघोरीदरम्यानच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. शहरातील हा सर्वात लांब उड्डाणपूल असून, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. 8.9 किमी लांबीचा उड्डाणपूल इंदोरा-दिघोरी हा नागपूरमधील सर्वात लांब उड्डाणपूल असून त्याची लांबी सुमारे 8.9 किलोमीटर आहे. या प्रकल्पासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. हा उड्डाणपूल कमाल चौक, रेशीमबाग, सक्करदरा, भांडे प्लॉट आणि दिघोरी नाका या प्रमुख भागांना जोडतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 30 मिनिटांचा प्रवास आता 8-9 मिनिटांत? इंदोरा ते दिघोरीदरम्यानचा प्रवास सध्या वाहतूक कोंडीमुळे सुमारे 30 मिनिटांचा होतो. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर हा प्रवास 8 ते 9 मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार असून, या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. उड्डाणपुलाची प्रमुख वैशिष्ट्ये इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाच्या प्रकल्पासाठी सुमारे 998 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाची एकूण लांबी 8.9 किलोमीटर असून, त्याची रुंदी सुमारे 12 मीटर आहे. इंदोरा ते दिघोरीदरम्यानची वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या उद्देशाने या पुलाची रचना करण्यात आली आहे. पुलावर दोन्ही दिशेने वाहतूक सुरू राहणार असून, त्यामुळे या मार्गावरील वाहनांची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ‘अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीट’ (UHPFRC) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाच्या मार्गात 2 रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) आणि 2 रेल्वे अंडरब्रिज (RUB) समाविष्ट करण्यात आले आहेत. पाचपावली येथील जुना रेल्वे ओव्हरब्रिज पाडून त्याच ठिकाणी नवीन ROB उभारण्यात आला आहे. तसेच डागा मेमोरियल हॉस्पिटल येथे नागरिकांना आणि रुग्णांना ये-जा करताना अडचण होऊ नये, यासाठी चढ-उतारासाठी विशेष रॅम्प तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आणि इतर नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे. अशोक चौक येथेही वाहतुकीच्या दृष्टीने विशेष रचना करण्यात आली आहे. या ठिकाणी 5 वेगवेगळ्या दिशांकडून येणारे रस्ते उड्डाणपुलाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे विविध दिशांनी येणाऱ्या वाहनांना मार्ग उपलब्ध होऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ होण्यास मदत होईल. यासोबतच उड्डाणपुलाखालील रस्त्यांचाही विकास करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ उड्डाणपुलावरीलच नव्हे, तर पुलाखालील स्थानिक वाहतुकीलाही अधिक चांगली सुविधा मिळणार आहे. इंदोरा-दिघोरी हा मार्ग नागपूर शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांपैकी एक असून, या प्रकल्पाच्या मार्गात 3 प्रमुख चौक आणि 11 छोटे चौक येतात. या चौकांवर वारंवार होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने उड्डाणपूल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. उड्डाणपुलामुळे वाहतूक सिग्नल आणि चौकांवरील थांबे कमी होऊन वाहनांना अधिक वेगाने आणि सलग प्रवास करता येण्याची अपेक्षा आहे. परिणामी इंदोरा ते दिघोरीदरम्यानचा प्रवास अधिक सुकर होण्यासोबतच या मार्गावरील नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हेही वाचा… रुग्णालयात जरांगेंची विखे पाटलांनी घेतली भेट:आरक्षणावर चर्चा, तब्येतीचीही विचारपूस मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 दिवसांचे उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणानंतर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याचदरम्यान मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विखे पाटील यांनी जरांगे यांची विचारपूस केली असता, रात्रीच्या वेळी प्रकृती अधिक बिघडत असल्याचे जरांगे यांनी सांगितले. “रात्रीचाच लय बेक्कार त्रास होतोय,” अशी तक्रार त्यांनी केली. त्यावर विखे पाटील यांनी जरांगे यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला. काही दिवसांत प्रकृतीत सुधारणा होईल, असे त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा…

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *