[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत देगलूर उपविभागीय पोलिसांनी मुखेड तालुक्यात कारवाई करत एका व्यक्तीच्या घरातून १ किलो ११५ ग्रॅम वाळलेला गांजा जप्त केला. या कारवाईत गांजाची हिरवी रोपेही आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. देगलूर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांना गुप्त बातमीदारामार्फत मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंद्री, ता. मुखेड येथील सुधाकर संतुकराव वडजे हा गांजा बाळगून त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंच, संबंधित अधिकारी, वजनकाटा कर्मचारी व छायाचित्रकारासह पथकाची व्यवस्था केली. त्यानंतर ३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजता सुधाकर वडजे यांच्या घरी झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान घराच्या अंगणातील एका ठिकाणी वाळलेल्या गांजाचे शेंडे व चुरा आढळून आला. वजन केले असता १ किलो ११५ ग्रॅम गांजा, अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला. तसेच मातीमध्ये लावलेली गांजाची हिरवी रोपे आढळल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.या प्रकरणी सुधाकर संतुकराव वडजे (वय ३५, रा. उंद्री, ता. मुखेड, जि. नांदेड) याच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३१०/२०२६, कलम ८(क), २०(२)(ब) एनडीपीएस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मुखेड व देगलूर पोलीस ठाण्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर व प्रभावी कारवाई सुरूच राहणार असल्याचे नांदेड जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे
[ads2]
















Leave a Reply