[ads1]
हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली शहरातून शनिवारी सकाळी काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खटकाळी बायपास परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाखाली कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर येऊन आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने हिंगोली जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव अमोल विठ्ठलराव गंगलवाड (वय ५०) असे आहे. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांची परभणी येथून हिंगोली जिल्हा पोलीस दलात बदली झाली होती. ते हिंगोली पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत होते. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गंगलवाड हे खटकाळी बायपास भागातील रेल्वे उड्डाणपुलाखाली आले होते. अकोल्याच्या दिशेने जाणारी रेल्वे जवळ येत असताना त्यांनी अचानक रेल्वेसमोर उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. रेल्वेच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ते त्यावेळी पोलीस गणवेशात आणि कर्तव्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय मार्के यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, घटनेचा तपास केला जात आहे. दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये अमोल गंगलवाड यांची पोलीस नियंत्रण कक्षातूनकन्वेक्शन सेल येथे बदली करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी त्यांनी रात्रीची ड्युटी पूर्ण केली आणि २९ ऑगस्टच्या सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
या घटनाक्रमामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असले तरी, बदली आणि त्यांच्या मृत्यूचा थेट संबंध असल्याचे अद्याप कोणतेही अधिकृत कारण समोर आलेले नाही. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय होते, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा तर्काला दुजोरा देण्याऐवजी पोलिसांच्या अधिकृत तपासाची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. एका पोलीस अधिकाऱ्याचा गणवेशातील असा दुर्दैवी अंत हा केवळ पोलीस दलासाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि परिचितांसाठीही अत्यंत वेदनादायी क्षण आहे. अमोल गंगलवाड यांच्या मनात नेमके काय सुरू होते, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.अमोल गंगलवाड नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र होते. या घटनेचा सखोल आणि संवेदनशील तपास होऊन सत्य समोर यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वास्तव न्यूज लाईव्हने कालच पोलिसांच्या तणावावर वृत्त प्रसिद्ध केले होते ..
खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?
[ads2]















Leave a Reply