धर्माबादमध्ये अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई; २.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

[ads1]

धर्माबाद (प्रतिनिधी):- नांदेड जिल्ह्यात अवैध गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, धर्माबाद पोलिसांनी बाभुळगाव फाटा परिसरात कारवाई करत आठ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह एकूण २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली धर्माबाद पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना बाभुळगाव फाटा येथे अवैध गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला. यावेळी संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन आढळून आले.

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये आठ गोवंशीय जनावरे अमानुषपणे कोंबून व कोणतीही काळजी न घेता बांधून ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ जनावरांची सुटका करून महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एमएच-२६ बीई-७६१५) किंमत २ लाख रुपये आणि आठ गोवंशीय जनावरे किंमत ८४ हजार रुपये, असा एकूण २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी दत्ता किशन शिलगीरे (वय ३६, व्यवसाय चालक, रा. करखेली, ता. धर्माबाद), बालेजी महेबूब शेख (वय ४२, रा. धर्माबाद) तसेच अजीम गौसुद्दीन कुरेशी (रा. करखेली, ता. धर्माबाद) यांच्याविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील संबंधित कलमांसह कलम ३(५) बीएनएस अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास धर्माबाद पोलीस करीत आहेत. कारवाईत पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.


Post Views: 111






[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *