नांदेड हादरले! ई-स्क्वेअरमध्ये रक्तरंजित गँगवार; तिघांची निर्घृण हत्या


नांदेड (प्रतिनिधी)-शहरात वाढत्या गँगवारच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली असून शहरातील ई-स्क्वेअर परिसरात तिघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहरातील कॅनाल रोडवर असलेल्या ई-स्क्वेअर परिसरात काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवत तीन युवकांवर धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात अरिजितसिग चव्हाण, सय्यद आवेज सय्यद सय्यद खलीलआणि आणखी एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. हल्ला इतका भीषण होता की तिघांनाही बचावाची संधी मिळाली नाही.

ही घटना गँगवारमधील जुना वाद किंवा वर्चस्वाच्या संघर्षातून घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तिघांवर एकाच वेळी समन्वय साधून हल्ला करण्यात आला असल्याने हल्लेखोरांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्लेखोरांनी नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसर बंद करून पंचनामा व पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू केली आहे. फॉरेन्सिक पथकाकडूनही घटनास्थळाची तपासणी करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

नांदेड शहरात कठोर कारवाईसाठी ओळखले जाणारे आणि ‘सिंघम’ अशी उपाधी मिळालेले अधिकारी कार्यरत असतानाही अशा प्रकारची तिहेरी हत्या घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरात गँगवार पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. विशेष म्हणजे तिन्ही युवकांना एकाच वेळी लक्ष्य करण्यात आले असल्याने हल्ल्यामागे मोठ्या टोळीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्लेखोरांची संख्या किती होती, त्यांचे नेमके उद्दिष्ट काय होते आणि या हत्येमागील सूत्रधार कोण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचे संकेतही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.या तिहेरी हत्येमुळे नांदेड शहर हादरले असून गँगवारचा वाढता प्रभाव रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हत्याकांडामागील संपूर्ण कट उघड होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks