![]()
राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र अतिष दांडेगावकर यांनी गुरुवारी ता. २६ मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीला चांगलाच हादरा बसला असून आता जिल्ह्यात भाजपाला बळ मिळून राजकिय समिकरणे बदलणार आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर याचा परिणाम होणार असल्याचे राजकिय वर्तुळातून बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र असलेल्या अतिष दांडेगावकर हे मागील काही दिवसांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यानुसार दांडेगावकर व भाजपाच्या नेत्यांमधून बैठका देखील झाल्या होत्या. त्यानुसार अखेर पक्ष प्रवेशाचा मुहुर्त गुरुवारी मुंबईत ठरला होता. दरम्यान, या पक्ष प्रवेशाला जाण्यापुर्वी अतिष दांडेगावकर यांनी वसमत विधानसभा मतदार संघात त्यांच्या समर्थकांशी चर्चाही केली होती. या चर्चेनंतरच त्यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला. पक्ष प्रवेशासाठी मुंबई येथे रवाना होण्यापुर्वी त्यांनी त्यांचे वडिल तथा माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे आशीर्वादही घेतले. त्यानंतर सुमारे २ हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर आज मुंबई येथे भाजपाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष अतिष दांडेगावकर यांचा अधिकृत पक्ष प्रवेश झाला. यावेळी त्यांचा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यावेळी माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी आमदार डॉ. प्रज्ञा सातव, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहेर यांची उपस्थिती होती. अतिष दांडेगावर यांच्या भाजपा प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात भाजपाला आणखी बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः वसमत विधानसभा मतदार संघ व कळमनुरी विधानसभा मतदार संघात भाजपाला बळ मिळणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत या पक्ष प्रवेशाचा परिणाम होणार असल्याचे राजकिय वर्तुळातून बोलले जात आहे. दरम्यान, अतिष दांडेगावकर यांच्या पक्ष प्रवेशावर माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
राष्ट्रवादीचे अतिष दांडेगावकरांचा मुंबईत भाजपामध्ये प्रवेश:हिंगोली जिल्ह्यात भाजपाला बळ मिळून राजकिय समिकरणे बदलणार
